कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून यंदा गोलरेषा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच ‘हॉक-आय’ तंत्रज्ञानही वापरण्यात येणार आहे. यंदा ३ ते २६ जून या कालावधीमध्ये ही स्पर्धा होणार
आहे.
दक्षिण अमेरिकेतील या स्पर्धेत १६ संघांचा सहभाग असतो, ज्यामध्ये फुटबॉल विश्वातील अव्वल पाच संघ सहभागी होत असतात. या स्पर्धेत लिओनेल मेस्सी, झेव्हियर हर्नाडेझ, लुइस सुआरेझ आणि जेम्स रॉड्रिगेझसारख्या नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंचा खेळ पाहायची संधी मिळणार आहे.
गेल्या वर्षी कॅनडामध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात पहिल्यांदा हॉक-आय या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. त्याचबरोबर इंग्लिश प्रीमिअर लीग, जर्मनीतील बुंदेसलीगा आणि इटालियन सीरिज-ए या स्पर्धामध्येही ‘हॉक-आय’चा वापर करण्यात आला होता.
यंदाच्या कोपा अमेरिका स्पर्धेमध्ये प्रत्येक स्टेडियममधील गोलजवळ सात कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सामनाधिकाऱ्याला गोलच्या वेळी नेमके काय घडले, हे कळू शकेल. त्याचबरोबर गोलरेषेजवळ चेंडू कसा गेला, हेदेखील सहजपणे पाहता येईल.