करोनामुळे ठप्प असलेलं क्रिकेट आजपासून (८ जूलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी मालिकेच्या रूपाने सुरू झालं. करोना व्हायरसच्या संकटानंतर ही पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. ही मालिका करोना योद्ध्यांसाठी समर्पित करण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेचे नाव ‘रेज द बॅट’ असे ठेवण्यात आले आहे. ही मालिका सुरू होण्याआधी इंग्लंडच्या संघाकडून करोना व्हायरस विरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

साऊथँप्टन येथे सुरु होणाऱ्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसाआधी इंग्लंडचे खेळाडू विशिष्ट प्रकारची ट्रेनिंग जर्सी परिधान करून मैदानात सरावासाठी उतरले. त्या जर्सींवर करोनाविरुद्ध लढणाऱ्या काही निवडक लोकांची नावे लिहिण्यात आली होती. ही नावे स्थानिक क्रिकेट क्लबद्वारे नामांकित केलेल्या मुख्य कर्मचाऱ्यांची होती. ज्यात शिक्षक, डॉक्टर्स, नर्स, समाजसेवक अशा अनेकांचा समावेश होता. इंग्लंडचा नियमित कसोटी संघाचा कर्णधार जो रुट याबाबत म्हणाला, “सर्वात कठीण परिस्थितीत आपल्या देशासाठी काम केलेल्या या शूर कर्मचाऱ्यांचा सन्मान आम्हाला करायचा होता. त्यामुळे आम्ही या मालिकेचा उपयोग करुन त्यांचा सन्मान केला. आम्ही त्यांची नावे अभिमानाने परिधान केली.” इंग्लंडच्या खेळाडूंनी कर्मचाऱ्यांची नावे असलेली ट्रेनिंग जर्सी घातल्याचे फोटो ICCने शेअर केले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सुमारे चार महिन्यांनंतर पुनरागमन होत आहे. त्या अनुषंगाने अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. पण त्याचसोबत निसर्गाची साथ हादेखील या सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अनेक सामने पावसामुळे वाया गेले. थोडीफार त्यासारखीच परिस्थिती पुन्हा क्रिकेटच्या ‘कमबॅक’च्या वेळी उद्भवली. हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरींमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन काही काळ लांबणीवर पडलं. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सामना सुरू होणार होता, पण पावसामुळे सामन्याची नाणेफेक लांबणीवर पडली.