देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी समाजाच्या अनेक स्तरातील व्यक्ती समोर येत आहेत. अनेक क्रीडापटू आणि क्रीडा संघटना करोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान आणि स्थानिक मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीचा खासदार गौतम गंभीरनेही आपली खेळाडू आणि खासदार म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी पाउल उचललं आहे.

गौतम गंभीरने आपल्या खासदार निधीतला १ कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गौतमने यासंदर्भातली घोषणा केली आहे.

दिल्लीतही अनेक करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सध्याच्या घडीला दिल्लीत रोजंदारीसाठी आलेले अनेक मजूर आपल्या गावी परत जाण्यासाठी दिल्लीच्या बस स्थानकावर गर्दी करुन आहेत. यामुळे दिल्लीची परिस्थिती सध्या चिंताजनक बनली आहे. गौतम गंभीरसोबत केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनीही आपल्या खासदार निधीतली १ कोटीची रक्कम पंतप्रधान सहायता निधीला दिली आहे.