नवी दिल्ली : दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू रजत भाटियाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दिल्लीच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये ४० वर्षीय भाटियाचे नाव घेण्यात येते. त्याने ११२ प्रथम श्रेणी लढती खेळताना ६४८२ धावा फटकावल्या. गोलंदाजीतही १३७ बळी घेतले. गेल्या हंगामात बांगलादेशमध्ये ‘अ’ श्रेणीचे सामने खेळण्याची भाटियाला संधी मिळाली होती. भाटियाला २०१४मध्ये  भारताकडून खेळायची एकमेव संधी होती. मात्र ती हुकली. अर्थातच त्याचे दु:ख करून घेत नाही, असे भाटियाने सांगितले. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संभाव्य संघात २०१४मध्ये भाटियाचा समावेश झाला होता. मात्र नंतर भारतीय संघात त्याची निवड झाली नाही.