माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची खंत
मुंबई : ‘आयसीसी’ युवा विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या भारत-बांगलादेश यांच्यातील अंतिम सामन्यात खेळाडूंमध्ये झालेला वाद हा खेळाला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे क्रिकेटला आता सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणता येणार नाही, असे भारताचा माजी कर्णधार कपिल देवने म्हटले आहे. उदयोन्मुख खेळाडूंना धडा मिळावा, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे कपिलने सांगितले.
‘‘कोण म्हणतो क्रिकेट हा आता सभ्य गृहस्थांचा खेळ आहे? तो एके काळी होता, परंतु आता नाही,’’ असे १९८३च्या विश्वविजेत्या भारताचा कर्णधार कपिलने सांगितले. आकाश सिंग आणि रवी बिश्नोई या भारतीय क्रिकेटपटूंसह मोहम्मद तौहिद हृदोय, शमिम हुसैन आणि रकिबूल हसन या तीन बांगलादेशच्या क्रिकेटपटूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कारण बांगलादेशने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवत विश्वविजेतेपदावर नाव कोरल्यानंतर अतिउत्साहाच्या भरात खेळाडूंमध्ये चकमक झाली. युवा क्रिकेटपटूंवर क्रिकेट मंडळांनी कठोर कारवाई करावी, असे कपिल म्हणाला.