जगाला क्रिकेट हा खेळ शिकवणाऱ्या इंग्लंड संघासमोर यंदाच्या वर्षात सुवर्णसंधी चालून आली आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी इंग्लंडचा संघ आता केवळ एक पाऊल दूर आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. या विजयासह इंग्लंडने तब्बल २७ वर्षांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

१९९२ साली इंग्लंडचा संघ पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र त्यावेळी इम्रान खानच्या पाकिस्तान संघाने स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर किमान ९ हजाराहून अधिक दिवस इंग्लंडचा संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याचं स्वप्न पाहत होता. अखेरीस घरच्या मैदानावर इंग्लंडने ही किमया साधून दाखवली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांनी सहज पूर्ण करुन दाखवलं. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अंतिम फेरीत इंग्लंडची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. रविवारी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामना रंगणार आहे.