भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचे व्हिडीओ पाहून फलंदाजीमध्ये सुधरणा करत असल्याचे पाकिस्तान संघातील आघाडीचा फलंदाज बाबर आझम यानं सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बाबर म्हणला की, ‘विराट कोहलीची फलंदाजी पाहत असतो. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तो आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतो हे खरच शिकण्यासारखं आहे. त्याचं हे कौशल्य शिकण्यासारखं आहे.’

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये रविवारी १६ जून रोजी लढत होणार आहे. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. या सहाही सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानचा पराभव केला आहे. यंदाच्या विश्वाचषकात भारतासारख्या तगड्या इंग्लंडचा पाकिस्तान संघाने पराभव केला आहे. पण, विंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरोधात पराभवचा सामना करावा लागला आहे.

२४ वर्षीय बाबर पुढे म्हणाला की, ‘अनुभवातून मी शिकण्याचा प्रयत्न करतोय. माझं १०० टक्के संघाला देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. कोहलीचा संघाच्या विजयाप्रति असणारं योगदान आधिक आहे. त्याच्याप्रमाणेच मीही संघाला योगदान देऊ इच्छितो.’

रविवारी होणाऱ्या सामन्याविषयी बोलताना बाबर म्हणाला, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळालेल्या विजयामुळे आमचा आत्मविश्वास बळावला आहे. तोच आत्मविश्वास या सामन्यांमध्ये आम्हाला विजयासाठी मदत करेल. २०१७ मध्ये मिळावलेला तो विजय आमच्यासाठी खास होता. दबावातील सामने खेळल्यामुळे संघिक कामगिरी चांगली होते.’

पुढे तो म्हणाला की, ‘भारताविरोधातील सामन्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. कारण, भारत आणि पाकमधील प्रत्येक सामना उत्साही असतो. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असते. रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी संपूर्ण संघ सकारत्मक असल्यामुळे चांगली कामगिरीची आपेक्षा आहे. संघातील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.’

‘भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संतुलन आहे. गोलंदाजीचे आक्रमण चांगलेय, पण इंग्लंडविरोधात आम्ही चांगली फलंदाजी केली होती. इंग्लंडचीही गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजीच्या माऱ्यासमोर आम्ही चांगली फलंदाजी करू असा विश्वास बाबरनं व्यक्त केला.’

विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये १६ तारखेला ‘हाय-व्होल्टेज’ सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचे चाहतेही या सामन्याची तेवढ्याच अतुरतेने वाट पाहत आहेत.रविवारी मँचेस्टरमध्ये सामना अपेक्षित असला तरी पावसामध्ये सामना वाहून जाण्याची शक्यता आहे. जर हा सामना झाला नाही तर क्रीडारसिकांची निराशा होईल. भारत पाकिस्तान संघांमधला सामना हा नेहमीच पॉइंट टेबलचा विचार न करणारा नी ते युद्ध अनुभवायला मिळावं असाच असतो, त्यामुळे हा सामना व्हायलाच हवा असंच सगळ्यांना वाटत असेल यात काही शंका नाही.