गौरव जोशी

क्रिकेटचा इतिहास हा त्यावरील पुस्तकांमधून उलगडतो. लंडनच्या स्टोनली सबर्ब परिसरामध्ये एक पुस्तकाचे दुकान आहे, तिथे क्रिकेटची आवड असणाऱ्या व्यक्तीने नक्कीच भेट दिली पाहिजे. जॉन मॅकेन्झी बुक स्टोअर्स असे या दुकानाचे नाव आहे. जगामधील सर्वाधिक क्रिकेटची पुस्तके येथे उपलब्ध आहेत. या दुकानाचे मालक मॅकेन्झी हे स्वत: या दुकानात अजूनही काम करतात.

मॅकेन्झी यांनी १९६३पासून क्रिकेटवर आधारित पुस्तकांचा संग्रह केला आहे. ते सध्या ७५ वर्षांचे असले तरी गेली ६० वर्षे क्रिकेटवरील वेगवेगळ्या १०,००० पुस्कांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. खेळाची इत्थंभूत माहिती असलेले १७४४ मधील क्रिकेटचे पहिले पुस्तकसुद्धा मॅकेन्झी यांच्याकडे आहे. तसेच अगदी सहा महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेले क्रिकेटचे पुस्तकदेखील या दुकानात मिळेल.

पहिल्यापासूनच मॅकेन्झी यांना क्रिकेटची आवड आहे. परंतु त्यापेक्षाही अधिक क्रिकेटच्या पुस्तकांबद्दल आवड आहे. याच छंदापायी सुरुवातीला क्रिकेटवर लिहिलेली वेगवेगळी पुस्तके जमा करायला ते लागले. १० वर्षांमध्ये भरपूर पुस्तकांचा संग्रह झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या ग्रंथालयाचे दुकानात रूपांतरण केले. पुस्तकांची संख्याच इतकी होती की त्यांनी त्यांच्या दुकानामागील बगिच्यामध्ये पुस्तकांसाठी एक खोली बांधली. या दुकानात प्रवेश केल्यावर सगळीकडे क्रिकेटचीच पुस्तके तुम्हाला दिसतील.

एकीकडे पाहिल्यास सचिन तेंडुलकर, दुसऱ्या बाजूला सुनील गावस्कर, समोर बघितले तर डॉन ब्रॅडमन.. त्याच्या जवळच माइक प्रॉक्टरदेखील पुस्तक आपल्याला दिसते. पण व्यवसायासंदर्भातील एक अविस्मरणी किस्सा मॅकेन्झी यांनी सांगितला. ते म्हणाले, ‘‘डॉन बॅड्रमन यांनी पंचविसावे शतक साकारल्यानंतर एक काचेचे वर्तुळाकार सन्मानचिन्ह तयार केले होते. मँचेस्टरला एका प्रदर्शनामध्ये मी ते सन्मानचिन्ह सर्वाना दाखवत होतो. माझ्या पुस्तकांच्या दुकानाबद्दलची माहितीदेखील तिथल्या लोकांना होती. त्या ठिकाणी बॅड्रमन यांची पत्नीदेखील होत्या. त्यांना मी बनवलेले सन्मानचिन्ह पाहून खूप आनंद झाला. मीसुद्धा आता लंडनला जात आहे, तुम्हीसुद्धा माझ्यासोबतच चला असा हट्ट त्यांनी धरला. मँचेस्टर ते लंडन तीन तासांच्या प्रवासात आम्ही खूप गप्पा मारल्या.’’

मग ऑस्ट्रेलियाहून डॉन ब्रॅडमन यांनी मॅकेन्झी यांना पत्र पाठवले. ‘‘तुम्ही पुढच्या वेळी ऑस्ट्रेलियाला आलात तर आपच्या घरी नक्की या,’’ असे त्यात आवर्जून नमूद केले होते. ब्रॅडमन यांची स्वाक्षरी असलेले ते पत्र मॅकेन्झी यांनी अजूनही जपून ठेवले आहे. इतकेच नव्हे, तर बॅड्रमन यांच्यासोबत त्याच्या घरी जाऊन चहा-कॉफीचा आनंददेखील त्यांनी घेतला आहे. मॅकेन्झी क्रिकेटमधील अनेक मातब्बर व्यक्तींना आत्तापर्यंत भेटले आहे. खास वेस्ट इंडिजमध्ये जाऊन गॅरी सोबर्स, डेरेक विंग्स यांच्यासोबतही त्यांच्या अनेक गप्पा झाल्या आहेत. भारताचे अब्बास अली बेग यांनीसुद्धा त्यांच्या दुकानाला भेट दिली होती.

दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ खूप छान प्रकारे लाकडी बॅट-बॉलचे चित्र आहे. या पुस्तकांच्या कामकाजावर मेकॅन्झी स्वत: संगणकाद्वारे लक्ष ठेवतात. यासंदर्भात त्यांनी  आणखी एक आठवण सांगितली, ‘‘एक इंग्लिश व्यक्ती सेवानिवृत्त होऊन खूप पूर्वीची पुस्तके घेऊन फ्रान्सला गेला होता. त्याने मेकॅन्झी यांना कळवले की, तुम्ही फ्रान्सला या मी तुम्हाला १०० पुस्तके देतो. १८५०मधील ही ऐतिहासिक क्रिकेटची पुस्तके घेण्यासाठी ते स्वत: तिथे गेले. परंतु पुस्तकांचा गठ्ठा इतका जड होता की त्यांची रेल्वे स्थानकावर अतिशय पंचाईत झाली. कधी पुस्तके पुढे, तर कधी हातातील बॅगा पुढे अशी त्रेधातीरपीट उडाली होती. अखेरीस बॅग सांभाळण्यासाठी मागे वळलो, तेव्हा पुस्तके गायब झाली होती. मग पुस्तक चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली. परंतु पुस्तके परत भेटतील, याची अपेक्षा त्यांनी सोडून दिली. अखेरीस निराश मन:स्थितीत पुन्हा माघारी परतण्यासाठी मी रेल्वेत बसलो. तिथे तिकीट तपासनीस आणि पोलिसांनी त्यांना हरवलेली पुस्तके भेटल्याचे सांगितले आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.’’