भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लोकेश राहुल भोपळाही न फोडता माघारी परतला. मात्र यानंतर कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या सोबतीने भारतीय संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी संयमीपणे खेळपट्टीवर तग धरुन राहत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. यादरम्यान विराट कोहलीने अर्धशतकही झळकावलं. या स्पर्धेतलं कोहलीचं हे सलग पाचवं अर्धशतक ठरलं आहे. अशी कामगिरी करणारा विराट कोहली विश्वचषक स्पर्धेतला एकमेव कर्णधार ठरला आहे.

याआधी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टिव्ह स्मिथने २०१५ साली अशी कामगिरी केली होती, मात्र त्यावेळी मायकल क्लार्ककडे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व होतं. त्यानंतर विराटने आजच्या सामन्यात स्मिथच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर असलेला विक्रम आपल्या नावे जमा केला होता. दरम्यान विराटने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला.