क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला भारतातील अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकलच्या रूपाने आपल्या आयुष्यातील दुसरी साथीदार मिळाली आहे. लवकरच सुरू होणार असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कार्तिकची भारतीय संघात निवड होऊ शकलेली नाही. मात्र वैयक्तिक जीवनातील त्याच्या आयुष्यातील सुखद क्षण नुकताच अवतरला.
   चेन्नईत एकाच तंदुरुस्ती प्रशिक्षकाकडे मार्गदर्शन घेताना या दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचे नात्यात रूपांतर करण्याचे दोघांनी नक्की केले आहे. काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील आयटीसी चोला या पंचतारांकित हॉटेलात या दोघांचे कुटुंबीय आणि मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा झाला. हा सोहळा झाल्यानंतर काही तासांतच दीपिका ऑस्ट्रेलियात सरावासाठी रवाना झाली तर दिनेश रणजी स्पर्धेत तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मेरठला रवाना झाला. मात्र प्रेमात पडल्यानंतरही या दोघांनी खेळातील कारकीर्दीकडे दुर्लक्ष न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच साखरपुडा झाला असला तरी शुभमंगल २०१५मध्ये करण्याचे या जोडीने ठरवले आहे.
दीपिकाचे हे पहिलेच लग्न असले तरी दिनेशचे हे दुसरे लग्न आहे. निकिताशी त्याचे २००७मध्ये लग्न झाले होते. मात्र त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर कार्तिकने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. दिनेश-दीपिका दोघांनीही आपल्या प्रेमप्रकरणाची प्रसारमाध्यमांना जराही कुणकुण लागू दिली नाही.