भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. आपल्या कारकिर्दीत भन्नाट गोलंदाजी आणि फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या इरफानला गेल्या काही वर्षांत भारतीय संघात स्थान मिळवता आलं नाही. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर इरफान क्रीडा वाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये, समालोचन करत असतो. याचसोबत सोशल मीडियावरही इरफान अनेक गोष्टींवर व्यक्त होत असतो. अनेकदा इरफानला त्याच्या धर्मावरुन सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. पण भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्यामुळे देशाच्या भल्यासाठी मी कायम बोलत राहिन अशी भूमिका इरफानने घेतली होती. TV Presenter रौनक कपूरसोबत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये बोलत असताना इरफान अनेक विषयांवर व्यक्त झाला आहे.

“तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नसेल तर सोशल मीडियावर तुम्ही स्वतःची चांगली इमेज तयार करु शकता. पण मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे, माझ्या देशातली एकता कायम रहावी यासाठी मी नेहमी बोलत राहीन. मी माझं खासगी आयुष्य फारसं सोशल मीडियावर आणत नाही. पण माझे विचार नेहमी सोशल मीडियावर मांडत असतो, ज्यामुळे माझ्या देशाला थोडासा फायदा होईल. सध्याच्या घडीला प्रसारमाध्यमं लोकांमध्ये भांडणं लावालया बसली आहेत, अशावेळी माझ्यासारख्या व्यक्तीने जर लोकांना एकत्र आणलं नाही तर माझं भारतासाठी खेळणं काय कामाचं??” इरफानने आपलं मत मांडलं.

काही दिवसांपूर्वी जामिया मध्ये झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन, CAA विरोधी चळवळ या सर्व मुद्द्यांवर इरफान सोशल मीडियावर व्यक्त झाला होता. “जामिया विषयी ट्विट करण्याआधी मी आधी स्वतः तो विषय समजावून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक विद्यार्थ्यांशी बोललो आणि त्यानंतर मी माझे विचार सोशल मीडियावर मांडले. अनेक क्रिकेटपटू समाजातील घटनांवर व्यक्त होणं टाळतात. खरं पहायला गेलं तर क्रिकेटपटू किंवा कोणत्याही खेळाडूने एखाद्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं तर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी ते फायदेशीरच ठरेल. हमारा देश महान है बोलून चालणार नाही, आपण जसं बोलतो तसं वागायलाही लागतं.”

कदाचीत आपण सोशल मीडियावर बोललो तर संघातलं स्थान गमावू अशी भीती अनेकांना असते. प्रतिस्पर्धी संघाची स्तुती केल्यामुळे एक फिल्मस्टार ट्विट करतो आणि समालोचकाला आपला जॉब गमवावा लागतो. ही एका प्रकारची भीतीच आहे. अशा परिस्थितीमध्ये जर या खेळाडूंना पाठींबा असेल तर ते नक्की व्यक्त होती. इरफानने आंतरराष्ट्रीय स्तरावर २९ कसोटी, १२० वन-डे आणि २४ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून इरफानच्या नावावर ३०० पेक्षा जास्त बळी जमा आहेत.