संपूर्ण देश १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संध्याकाळी सात वाजल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने निवृत्तीसाठी १५ ऑगस्ट आणि संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांचीच वेळ का निवडली याबद्दल अजुनही अनेक चर्चा सुरु आहेत. परंतू धोनीचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांच्यामते गेल्या वर्षभरात प्रसारमाध्यमांतून होणाऱ्या टीकेमुळेही धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला असेल.

अवश्य वाचा – धोनीची निवृत्ती : चेन्नई सुपरकिंग्जच्या CEO नी उलगडलं सात वाजून २९ मिनीटांचं गणित

“गेल्या वर्षभरात प्रसारमाध्यमांमध्ये धोनीवर बरीच टीका होत होती. वर्षभर भारतीय संघाबाहेर असताना तो संघात पुनरागमन कसं करु शकतो असा या टीकेचा सूर होता. २०१९ विश्वचषकानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता. मला नेमकं सांगता येणार नाही, पण कदाचीत या टीकेमुळेही त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याची शक्यता काय आहे. खरं कारण काय आहे हे त्याच्याकडूनच समजेल.” बॅनर्जी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

अवश्य वाचा – २०११ विश्वचषक विजयानंतरही धोनीच्या कर्णधारपदावर होतं गंडांतर, ‘या’ माणसाने केली थेट मध्यस्थी

फुटबॉल खेळणाऱ्या धोनीला क्रिकेटची गोडी लावण्यात केशव बॅनर्जी यांचा मोठा वाटा आहे. बॅनर्जींच्या मते धोनी अजुन किमान एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला असता. धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे मलाही वाईट वाटलं पण तुम्हाला भावनांवर आवर घालता यायला हवा असंही बॅनर्जी म्हणाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही धोनी आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.