१५ ऑगस्टच्या संध्याकाळी भारतीय क्रिकेट संघातलं धोनीपर्व अखेरीस संपलं. संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संध्याकाळी सात वाजता धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत…आज संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांनी मी निवृत्त झालोय असं समजावं. धोनीने अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. निवृत्तीसाठी धोनीने १५ ऑगस्ट आणि ७ वाजून २९ मिनीटांची वेळ का निवडली यावर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते. लष्कर आणि भारतीय रेल्वेत काम करणाऱ्या धोनीच्या देशभक्तीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे निवृत्तीसाठी १५ ऑगस्ट यासारखा दुसरा चांगला दिवस धोनीला मिळाला नसता अशी माहिती त्याचा मॅनेजरने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

परंतू ७ वाजून २९ मिनीटांच्या वेळेबद्दल अजुनही अनेक चर्चा सुरु होत्या. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या या वेळेमागचं गणित उलगडवून दाखवलं आहे. धोनीच्या निवृत्तीविषयी चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनीवासन यांना समजताच त्यांनी विश्वनाथन यांना फोन करुन धोनीबद्दल ज्या बातम्या येतायत त्या खऱ्या आहेत का असा प्रश्न विचारला. “श्रीनीवासन यांच्या प्रश्नानंतर मी देखील बुचकळ्यात पडलो कारण मलाही त्याबद्दल माहिती नव्हती. मी याबद्दल माहिती घेण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन धोनीला निवृत्तीबद्दल विचारलं तर त्यानेही होकार दर्शवला. मी त्याला हे कधी केलंस असं विचारलं त्यावर तो म्हणाला इन्स्टावर टाकलंय ७ वाजून २९ मिनीटांनी…दक्षिणेकडील राज्यांत बहुतांश भागांमध्ये सात वाजून २९ मिनीटांची वेळ ही सूर्यास्ताची वेळ मानली जाते. माझ्यामते याच कारणासाठी त्याने सात वाजून २९ मिनीटांची वेळ निवडली. सूर्यास्त आणि निवृत्ती या दोन घटनांचा मेळ आपणही लावू शकतो हे त्याने सांगण्याची गरज नाही.” मुंबई मिरर वृत्तपत्राशी बोलताना विश्वनाथन यांनी माहिती दिली.

धोनी सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करतो आहे. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या खेळाडूंसाठी १५ ते २० ऑगस्टदरम्यान चेन्नईत एम.ए.चिदंबरम मैदानात ट्रेनिंग कँपचं आयोजन केलं आहे. धोनीसह रैना, केदार जाधव, पियुष चावला, कर्ण शर्मा असे अनेक खेळाडू या कँपमध्ये सहभागी झालेत. २० ऑगस्टनंतर चेन्नईचे खेळाडू युएईला रवाना होतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही धोनी पुढचे काही हंगाम आयपीएल खेळत राहणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलच्या स्पर्धेचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलंय.