अपराजित्व राखणाऱ्या सुनील नारायण व पद्मिनी राऊत (दोघांचेही प्रत्येकी साडेपाच गुण) हे जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेतील आठव्या फेरीत कशी कामगिरी करतात याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आठव्या फेरीत सुनील याच्यापुढे चीनचा खेळाडू वेई येई याचे आव्हान असणार आहे. सुनील याने या स्पर्धेत आतापर्यंत अनेक मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला आहे. आठव्या फेरीतही तो अशीच कामगिरी करील अशी आशा आहे. मुलांच्या गटातच वंडरबॉय म्हणून ख्याती मिळविलेल्या अरविंद चिदंबरम याला रशियाच्या ओपेरीन ग्रिगोरी याच्याशी खेळावे लागणार आहे. सातव्या फेरीत रॉबिन व्हान काम्पेन याच्यावर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या अनुराग म्हामळ या भारताच्या खेळाडूला मंगळवारी रशियाच्या मिखाईल अन्तीपोव याच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
मुलींमध्ये पद्मिनी हिला रशियाची अ‍ॅलेक्झांड्रा गोर्याश्किन हिच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. पद्मिनी हिने आतापर्यंत अपराजित्व राखले असले तरी सातव्या फेरीत पराभवाच्या छायेतून तिने डाव बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले होते. भारताचीच इव्हाना फुर्टाडो हिला इराणच्या सारस्दात खादेमलशेरी हिच्याशी झुंज द्यावी लागणार आहे, तर पी.व्ही.नंदिता हिची रुमानियाच्या गालीप लोआना हिच्याशी गाठ पडणार आहे. ऋचा पुजारी व श्रिजा शेषाद्री यांच्यापुढे सॅबिना इब्राहिमोवा (अझरबैजान) व निग्वेन थिमेई हुंग (व्हिएतनाम) यांचे आव्हान असेल.