महाराष्ट्राला २०९ धावांची आघाडी
अक्षय दरेकर या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने घेतलेल्या सहा बळींमुळेच महाराष्ट्राने आसामविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात २०९ धावांची भक्कम आघाडी मिळविली.
महाराष्ट्राने ८ बाद ३४३ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. तथापि, आणखी १८ धावांमध्ये त्यांनी उर्वरित दोन गडी गमावले. अंकित बावणे हा ४२ धावांवर तंबूत परतला. त्यामध्ये त्याने चार चौकार मारले. त्याच्यापाठोपाठ अनुपम सकलेचा (९) यानेही तंबूचा रस्ता धरला. आसामकडून अरूप दास व महंमद सय्यद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
दरेकर (६/५३) व श्रीकांत मुंढे (३/१७) यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे आसामच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची ही दरेकर याची सहावी वेळ आहे. नीरज पटेल याने केलेल्या ४० धावांचा अपवाद वगळता आसामच्या एकाही फलंदाजास आत्मविश्वासाने खेळ करता आला नाही. त्याच्यासह त्यांचे केवळ पाच फलंदाज दोन आकडी धावा करू शकले. मूळचा महाराष्ट्राचा असलेला व सध्या आसामकडून खेळणाऱ्या धीरज जाधव याला केवळ १७ धावा करता आल्या. आसामचा पहिला डाव ७१.२ षटकांत १५२ धावांमध्ये आटोपला. उर्वरित खेळात महाराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद १६ धावा केल्या. सामन्याचे आणखी दोन दिवस बाकी आहेत. महाराष्ट्राने आणखी दोनशे धावांनी आघाडी वाढवित निर्णायक विजय मिळविण्याची त्यांना चांगली संधी आहे.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव : ९६.२ षटकांत ३६१ (संग्राम अतितकर ४६, केदार जाधव १२८, पुष्कराज चव्हाण ६५, अंकित बावणे ४०, अरूप दास ३/८३, महम्मद सय्यद ३/९२) व दुसरा डाव बिनबाद १६
आसाम पहिला डाव : ७१.२ षटकांत १५२ (नीरज पटेल ४०,अमित सिन्हा २०,अक्षय दरेकर ६/५३, श्रीकांत मुंढे ३/१७)