वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज आणि कर्णधार ब्रायन लारा हा भारताचा क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरपेक्षा श्रेष्ठ फलंदाज असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डेव्हिड बून यांनी व्यक्त केले आहे. डेव्हिड बून हे ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये ८० च्या दशकात महत्त्वाचे योगदान देणाऱया फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या फलंदाजीची स्टाईल देखील अनोखी होती. बून नुकतेच एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी भारतात आले होते. त्यावेळी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना बून यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटविषयीचे मत व्यक्त केले.

ते म्हणाले की, क्रिकेट खेळाचे नैसर्गिक कौशल्य प्राप्त असलेले मोजकेच क्रिकेटपटू आपल्याला आजवर पाहायला मिळाले आहेत. चांगले खेळण्याची प्रतिभा ही सर्वच खेळाडूंकडे असते, पण ते कसे खेळतात यावर सारे अवलंबून आहे. नैसर्गिक खेळाचे वरदान मिळालेला सर्वोत्तम फलंदाज म्हणून निवड करायची झाल्यास मी ब्रायन लारा याला पसंती देईन, असे बून म्हणाले. सचिन तेंडुलकर देखील क्रिकेटविश्वाला मिळालेला उत्कृष्ट खेळाडू आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारात कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची तयारी ठेवणारा खेळाडू म्हणून सचिनची मी नेहमीच प्रशंसा करत आलो आहे. क्रिकेट खेळाप्रती स्वत:ला मानसिकरित्या प्रबळ करण्यासाठी मेहनत घेतलेला खेळाडू म्हणून मी सचिनकडे पाहतो. पण नैसर्गिकरित्या प्रतिभासंपन्न खेळाडूंच्या यादीत मी सचिनचा समावेश करू शकत नाही, असेही बून पुढे म्हणाले.

ट्वेन्टी-२० क्रिकेटला माझे समर्थन आहे, पण त्याचवेळी कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी होणार नाही, याची जबाबदारी कसोटी क्रिकेट खेळणाऱया देशांची असल्याचे बून यांनी स्पष्ट केले. ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच कसोटी क्रिकेट देखील महत्त्वाचा प्रकार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूचा खरा कस लागतो. त्यामुळे कसोटीचे महत्त्व जर कमी होऊ लागले असेल, तर ते टिकवून ठेवण्यासाठी दिवस-रात्र कसोटीसारखे पर्याय चोखंदळून पाहण्यास हरकत नसल्याचे बून म्हणाले.