गुजरातला नमवत हैदराबाद अंतिम फेरीत; जेतेपदासाठी रविवारी बंगळुरूशी झुंजणार
जगभरातले गोलंदाज डेव्हिड वॉर्नर या नावाचा धसका का घेतात, याचा प्रत्यय गुजरात लायन्सच्या गोलंदाजांना शुक्रवारी आला. गुजरातच्या १६२ धावांचा पाठलाग करताना हैदराबादने सातत्याने विकेट्स गमावल्या. मात्र वॉर्नरच्या झुंजार अर्धशतकी (नाबाद ९३) खेळीच्या जोरावर हैदराबादने थरारक विजय साकारला आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. आता रविवारी हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे.
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन भोपळाही न फोडता बाद झाला. मोझेस हेनरिक्स ६ चेंडूंत ११ धावा करुन तंबूत परतला. डेव्हिड वॉर्नर आणि युवराज सिंग जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी केली. शिविल कौशिकने युवराजला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ८ धावा केल्या. ड्वेन ब्राव्होने दीपक हुडाला पायचीत करत हैदराबादच्या डावाला खिंडार पाडले. एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही वॉर्नरने आक्रमण सुरुच ठेवले. अष्टपैलू बेन कटिंगला कौशिकने बाद केले. वॉर्नरने नमन ओझाच्या साथीने ३.२ षटकांत सहाव्या विकेटसाठी ३३ धावांची भागादारी करत धावगती नियंत्रणात ठेवली. ड्वेन ब्राव्होने ओझाला बाद करत हैदराबादला अडचणीत आणले. ओझा बाद झाला तेव्हा २४ चेंडूत ४५ धावांची आवश्यकता होती. मात्र वॉर्नरने बिपुल शर्माच्या साथीने ३.२ षटकांत ४५ धावांची वेगवान भागीदारी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वॉर्नरने ११ चौकार आणि ३ षटकारांच्या साह्य़ाने ५८ चेंडूंत ९३ धावांची अफलातून खेळी साकारली. बिपुलने ११ चेंडूंत २७ धावा करत वॉर्नरला तोलामोलाची साथ दिली.
तत्पूर्वी, आरोन फिंचच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात लायन्सने १६२ धावांची मजल मारली. ब्रेंडन मॅक्क्युलमच्या साथीने एकलव्य द्विवेदीला सलामीला पाठवण्याचा प्रयोग फसला. भुवनेश्वर कुमारने त्याला ५ धावांवर बाद केले. ट्वेन्टी-२० विशेषज्ञ अशी प्रतिमा असलेला कर्णधार सुरेश रैना केवळ एक धाव काढून तंबूत परतला. ट्रेंट बोल्टने त्याला बाद केले. दिनेश कार्तिक आणि ब्रेंडन मॅक्क्युलम जोडीने ४४ धावांची भागीदारी करत डाव सावरला. चोरटी धाव घेण्याचा कार्तिकचा प्रयत्न अंगलट आला. त्याने २६ धावा केल्या. मॅक्क्युलम धोकादायक ठरणार असे चित्र असताना बिपुल शर्माने बाद केले. त्याने ३२ धावांची खेळी केली. तडाखेबंद फटकेबाजीसाठी प्रसिद्ध ड्वेन स्मिथला बेन कटिंगने एका धावेवर बाद केले. आरोन फिंचने रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्होला साथीला घेत गुजरातला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. फिंचने ७ चौकार आणि २ षटकारांच्या साह्य़ाने ३२ चेंडूत ५० धावांची खेळी केली. जडेजाने १५ चेंडूत १९ तर ब्राव्होने १० चेंडूत २० धावा केल्या. हैदराबादतर्फे भुवनेश्वर कुमार आणि बेन कटिंगने प्रत्येकी २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
गुजरात लायन्स : २० षटकांत ७ बाद १६२ (आरोन फिंच ५०, ब्रेंडन मॅक्क्युलम ३२; बेन कटिंग २/२०, भुवनेश्वर कुमार २/२७)पराभूत विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद : १९.२ षटकांत ६ बाद १६३ (डेव्हिड वॉर्नर ९३; शिविल कौशिक २/२२)
सामनावीर : डेव्हिड वॉर्नर.