भारताकडून खणखणीत सलामी करत शानदार विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर हे दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या व्यवस्थापनात आपले कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दोन्ही खेळाडूंना जिल्हा संघटनेच्या क्रिकेट समितीत स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याबरोबरच आकाश चोप्रा व राहुल संघवी यांचाही या समितीत समावेश आहे. या समितीकडे निवड समिती सदस्य निवडण्याचे तसेच विविध संघांच्या प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष राहुल शर्मा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, लोढा समितीच्या शिफारशींनुसार या समितीला अधिकार देण्यात आले आहेत. गंभीर हा स्वत: अजूनही खेळत असल्यामुळे निवड समिती नियुक्त करण्याबाबत तो कसा निर्णय घेऊ शकणार, हाच प्रश्न निर्माण होणार आहे. गतवर्षी त्याला संघटनेवर शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून संधी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे सेहवाग हे स्वत: क्रिकेट प्रशिक्षण अकादमी चालवित आहेत. तसेच संघटनेच्या मालकीचे इंडिया टीव्ही यावर ते तज्ञ समीक्षक म्हणून काम करीत असल्यामुळे त्यांना एकाच वेळी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळता येणार नाहीत अशीही टीका केली जात आहे.

मुंबई इंडियन्स संघाशी संघवी हे संबंधित आहेत तर चोप्रा हे अनेक वाहिन्यांवर तज्ञ म्हणून काम करीत असतात. तसेच संघवी व चोप्रा हे दोघेही मुंबईत स्थायिक झाल्यामुळे ते दिल्ली संघटनेवर कसे काम करणार अशीही शंका उपस्थित केली जात आहे.  याबाबत दिल्ली संघटनेचे सचिव विनोद तिहारा यांनी सांगितले, ‘‘समितीच्या सदस्यांना मानधन द्यायचे की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. गंभीर हा विशेष निमंत्रित म्हणूनच या समितीवर काम करणार आहे.’’