चिनी कंपनी व्हिवोसोबत करारभंग करायचा की नाही, याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) स्पष्ट करण्यात आले आहे. व्हिवो ही इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) शीर्षक प्रायोजक कंपनी आहे. त्याच वेळेला ‘आयपीएल’च्या लांबणीवर पडत चाललेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीबाबतही निर्णय झालेला नाही.

भारताने १५ जूनच्या लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयपीएल’चे शीर्षक प्रायोजकत्व व्हिवोकडे राहणार की नाही यावरून चर्चा सुरू आहे. ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषक, आशिया चषकाचे भवितव्य अद्याप निश्चित नाही. या स्थितीत आयपीएलची बैठक घेऊन आम्ही काहीच साध्य करू शकत नाही. आयपीएलच्या प्रायोजकत्वावरून आम्हाला चर्चा करायची आहे, मात्र अजून करार रद्द केलेला नाही,’’ असे ‘बीसीसीआय’मधील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

‘‘प्रायोजकत्वाचा करार करताना जे नियम आहेत त्याचा आढावा सुरुवातीला घेण्यात येईल. करारभंग जर झाला तर बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे का याचादेखील आढावा घ्यावा लागेल. आम्ही करारभंग करून जर व्हिवोला फायदा होत असेल तर ते नुकसानीचे ठरेल. ४४० कोटी रुपये एका वर्षांच्या करारानुसार मिळतात. हा करार मोडता सर्व बाजूने विचार करावा लागेल,’’ असे ‘बीसीसीआय’मधील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जर ‘व्हिवो’ने स्वत:हून करारातून माघार घेतली, तर मात्र ‘बीसीसीआय’ नवीन प्रायोजकत्वाचा शोध घेईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. करोनामुळे आर्थिक संकट असताना लगेचच नवीन प्रायोजक मिळेल की नाही याबाबतही ‘बीसीसीआय’ साशंक आहे.

‘आयपीएल’ पूर्णपणे मुंबईत?

‘आयपीएल’ जर या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली, तर प्रवासासंबंधीचे निर्बंध पाहता ती पूर्णपणे मुंबईतच होईल का याविषयी चर्चा सुरू आहे. ‘‘मुंबईत क्रिकेटची दिवस-रात्र लढत खेळवण्यात येतील अशी चार मैदाने आहेत. या स्थितीत प्रवासाचे निर्बंध राहणार नाहीत. मात्र एकाच शहरात आयपीएल खेळवण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप नाही. अर्थातच करोनाचे संकट दूर होणे तोपर्यंत गरजेचे आहे,’’ असे ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी म्हणाले. मुंबईत चर्चगेट येथे वानखेडे, ब्रेबॉर्न ही दोन मैदाने असून नवी मुंबईत डी. वाय.पाटील आणि रिलायन्स स्टेडियम यांचा समावेश आहे.