पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट दीपा मलिकने सोमवारी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. भारताच्या पॅरालिम्पिक समितीचं अध्यक्षपद स्विकारण्यासाठी दीपा मलिकने हा निर्णय घेतल्यचं कळतंय. पॅरालिम्पिक खेळांमध्ये पहिलं पदक मिळवणारी भारतीय महिला खेळाडू हा बहुमान दीपा मलिकच्या नावावर जमा आहे. २०१६ साली रिओमध्ये झालेल्या शॉटपुट प्रकारात दीपाने रौप्यपदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त IPC ओशिनीया-आशियाई अजिंक्यपद (२०१६) यासह अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये दीपाने पदकांची कमाई केली होती.

राष्ट्रीय क्रीडा संहीतेनुसार कोणत्याही भारतीय खेळाडूला संघटनेत काम करायचं असेल तर त्याला आधी निवृत्ती स्विकारावी लागते. या नियमाचं पालन करतानाच दीपाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर १९७० साली हरियाणातील सोनीपत शहरात दीपा मलिकचा जन्म झाला. ३० व्या वर्षात दीपा मलिक यांचं एक ऑपरेशन झालं, यादरम्यान तिला अर्धांगवायूचा झटका आला. ज्यामुळे गेली १९ वर्ष दीपा मलिक आपलं आयुष्य व्हिलचेअरवरच आहेत. डॉक्टरांनी दीपा मलिकला तू कधीही चालू शकणार नाहीस असं सांगितलं होतं. मात्र मेहनत आणि जिद्द या जोरावर दीपा मलिकने क्रीडा क्षेत्रात आपलं नाव कमावलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपा मलिकचा भारतीय क्रीडा क्षेत्रातील मानाचा समजल्या जाणाऱ्या खेल रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.