रिओ ऑलिम्पिकसाठी दमदार सराव सुरू केलेल्या दीपिका कुमारीने तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील गेल्या पाच वर्षांतील दीपिकाचे हे चौथे पदक आहे. कोरियाच्या चोई मिसुनने सुवर्णपदक पटकावले.

तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दीपिकाला सुवर्णपदकाने सातत्याने पदकाची हुलकावणी दिली आहे. या स्पर्धेत उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत सहज विजय मिळवीत दीपिकाने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र कोरियाच्या मिसुनने अंतिम लढतीत दीपिकावर ६-२ अशी मात केली.
पहिल्या सेटमध्ये दीपिका आणि मिसुन यांनी २९ गुण मिळवले. यानंतर मिसुनने दोनदा प्रत्येकी २९ गुण मिळवत ५-१ अशी भक्कम आघाडी घेतली. शेवटच्या सेटमध्ये दोघींनीही २८ गुणांची कमाई केली आणि मिसुनने आघाडीच्या बळावर बाजी मारली.
दीपिकाने २०१० साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच २०१२मध्ये अंताल्या येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात सुवर्णपदकावर कब्जा केला होता. मात्र तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदकापासून यंदाही तिला वंचित राहावे लागले आहे. याआधी तिने इस्तंबुल (२०१२), टोकियो (२०१२), पॅरिस (२०१३) येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रौप्यपदक पटकावले आहे.
‘‘मी मारलेले बाण वरच्या दिशेने लागले. मी लक्ष्याच्या दिशेने एकाग्र करून खेळण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पण माझे प्रयत्न अपुरे ठरले,’’ अशा शब्दांत दीपिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या.