News Flash

CSK vs DC : दिल्लीकडून चेन्नईचा पालापाचोळा, शॉ-धवन यांची स्फोटक खेळी

शिखर धवन, पृथ्वी शॉ यांची दमदार अर्धशतके

दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जवर 7 गड्यांनी सहज मात दिली. दिल्लीचा नवा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी करू दिली. सुरेश रैनाची अर्धशतकी खेळी आणि सॅम करनच्या झटपट धावांमुळे चेन्नईने दिल्लीसमोर 20 षटकात 7 बाद 188 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत दिल्लीचा विजय सोपा केला. सामन्यात 85 धावांची खेळी केलेल्या शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

दिल्लीचा डाव

चेन्नईच्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पाच षटकात  संघाच्या 50 धावा फलकावर लावल्या. इंग्लंड दौऱ्यात नाव कमावलेल्या शार्दुल ठाकूरच्या पहिल्या षटकात धवन-शॉने 17 धावा वसूल केल्या. त्यानंतर शॉने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शॉनंतर धवननेही आपले अर्धशतक साकारले. या दोघांनी अकराव्या षटकात संघातचे शतक पूर्ण केले. आक्रमक झालेल्या पृथ्वीला ब्राव्हाने बाद करत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. पृथ्वीने 38 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 72 धावा फटकावल्या. धवन शतकाकडे कूच करत असताना शार्दुलने त्याला पायचीत पकडले. धवनने 54 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 85 धावा केल्या. धवन बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून शार्दुलला 2 बळी घेता आले असले तरी, त्याच्या 3.4 षटकात 53 धावा कुटल्या गेल्या.

चेन्नईचा डाव

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मात्र, दुसऱ्याच षटकात फाफ डु प्लेसिसला आवेश खानने शून्यावर पायचीत पकडले. त्याच्या पुढच्याच षटकात ख्रिस वोक्सने ऋतुराजला वैयक्तिक 5 धावांवर तंबूत धाडले आणि चेन्नईला अडचणीत टाकले. त्यानंतर सुरेश रैना आणि मोईन अली यांनी दणक्यात सुरुवात केली. 5 षटकात चेन्नईेने 2 बाद 30 धावा फलकावर लावल्या. मोईन अलीने नवव्या षटकात अश्विनला लागोपाठ दोन षटकार ठोकले. मात्र या षटकारानंतर अश्विनने त्याला तंबुचा मार्ग दाखवला. अलीने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांची खेळी केली.

10 षटकात चेन्नईने 3 बाद 71 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आलेल्या अंबाटी रायुडू आणि सुरेश रैनाने तेराव्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. संघाचे शतक पूर्ण केल्यानंतर रैनाने आपले अर्धशतक साकारले. टॉम करनने या रैना-रायुडूची भागीदारी तोडली.  मोठी फटका खेळण्याच्या नादात रायुडू करनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 23 धावा केल्या. 16व्या षटकात रैना दुसरी धाव घेताना धावबाद झाला. आयपीएलचा मागील हंगाम न खेळलेल्या रैनाने दमदार पुनरागमन करत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. रैनानंतर सर्वांची नजरा लागून राहिलेला धोनी मैदानात आला, पण  आवेश खानने त्याला शून्यावर माघारी धाडले. धोनी बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांनी चेन्नईच्या डावाला आकार दिला. करनने 15 चेंडूत 34 धावांची खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून देण्यात मदत केली. तर, जडेजा 26 धावांवर नाबाद राहिला.  दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 2 तर, अश्विन आणि टॉंम करन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 11:14 pm

Web Title: delhi capitals beat chennai super kings in first match of ipl 2021 adn 96
Next Stories
1 सुनील गावसकरांनी उलगडलं पृथ्वी शॉच्या यशाचं मर्म
2 IPL 2021: CSKचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर चौथा भोपळा
3 आयपीएलमध्ये ‘या’ चार भारतीय गोलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम
Just Now!
X