नवी दिल्ली : युवा मल्ल सागर धनखड हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला कुस्तीपटू सुशील कुमारला पौष्टिक आहार पुरवण्याची केलेली मागणी दिल्ली न्यायालयाने फेटाळताना ही ‘अत्यावश्यक गरज’ नसल्याचे नमूद केले.

२०१८च्या दिल्ली कारागृह नियमानुसार तुरुंगात आरोपीच्या प्राथमिक गरजांकडे लक्ष दिले जाते. परंतु पौष्टिक आहार हा कोणत्याही प्रकारे अत्यावश्यक गरज नाही, असे मुख्य महानगर दंडाधिकारी सतवीर सिंग लांबा यांनी बुधवारी सांगितले.

आरोग्य आणि कामगिरी राखण्यासाठी पौष्टिक आहार अत्यावश्यक असल्याची मागणी करणारी याचिका सुशीलने रोहिणी न्यायालयात केली. सुशीलच्या प्रकृतीला  पौष्टिक आहाराची आवश्यकता नसल्याचे कारागृह प्रशासनाने आपल्या उत्तरात म्हटले.

मालमत्तेच्या वादातून छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या हाणामारीत सागरची हत्या आणि आणखी दोघांना जखमी केल्याप्रकरणी सुशील आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. सध्या सुशील दिल्लीच्या मंडोली कारागृहात आहे. या हत्येप्रकरणी सुशील हा मुख्य आरोपी आणि सूत्रधार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.