मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पी.व्ही.सिंधूला लखनौ येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. अन्य लढतीत अव्वल मानांकित किदम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.
श्रीकांतने इस्कंदर झुल्करनैन झैनुदीनवर २१-९, २१-१२ असा सहज विजय मिळवला. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपने चीनच्या झ्यू सियुनावर २१-१९, २१-१० अशी मात केली.
महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने निंगेशी ब्लॉक हजारिका आणि हरिका वेलूडर्थी जोडीचा २१-१९, २१-१० असा पराभव केला. पुरुष दुहेरीत अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा जोडीने अग्गा प्रतामा आणि श्लोक रामचंद्रन जोडीला २१-१९, २१-६ असे नमवले.
तृतीय मानांकित सिंधूला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. इंडोनेशियाच्या निचापॉन जिंदापॉलने सिंधूवर १८-२१, २६-२४, २१-१७ अशी मात केली.

सिंधू ११व्या स्थानी
नवी दिल्ली : मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी झेप घेतली आहे. नव्या हंगामाची दमदार सुरुवात करणारी सिंधू अव्वल दहामध्ये स्थान पटकावण्यापासून काही गुणांच्या अंतरावर आहे. ‘भारताची फुलराणी’ सायना नेहवाल दुसऱ्या स्थानी स्थिर आहे. पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांत नवव्या तर एच. एस. प्रणॉय २०व्या स्थानी स्थिर आहे. अजय जयरामची चार स्थानांनी घसरण होऊन तो २५व्या स्थानी आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा १४व्या स्थानी कायम आहेत.