वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्या सामन्यात वापरलेली प्रत्येक गोष्ट खास बनून जाते. अंगात घातलेल्या जर्सीपासून ते मैदानावरच्या स्टंम्पसपर्यंत प्रत्येक वस्तूला एक वेगळे महत्व प्राप्त होते. विजेत्या संघातील खेळाडू आणि सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांना विश्वविजयाची एखादी तरी आठवण आपल्याजवळ कायमस्वरुपी असावी असे वाटते. काहीवेळा वर्ल्डकपमध्ये वापरलेल्या वस्तूंचा एखाद्या सामाजिक उपक्रमासाठी लिलाव होतो आणि ती वस्तूला लाखो, कोटयावधी रुपयाला खरेदी केली जाते. महेंद्र सिंह धोनीची बॅट याचे उत्तम उदहारण आहे.

भारतातील लाखो क्रिकेटप्रेमींच्या गळयातील ताईत असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वर्ल्डकप फायनलमध्ये वापरलेल्या बॅटला लिलावामध्ये विक्रमी किंमत मिळाली. वानखेडेवर रंगलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात धोनीने लाँग ऑनला शानदार षटकार ठोकून २८ वर्षानंतर भारताचे विश्वविजयाचे स्वप्न साकार केले होते. धोनीच्या बॅटमधून निघालेल्या त्या षटकाराने संपूर्ण भारतात जल्लोषाचे निमित्त दिले होते.

एकूणच त्या बॅटने समस्त भारतीयांची विश्वविजयाची स्वप्नपूर्ती केली. भारताने २०११ साली वर्ल्डकप जिंकला. त्याचवर्षी जुलै महिन्यात लंडनमधली एका हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात भारतातील आरके ग्लोबल या गुंतवणूक समूहाने तब्बल ७२ लाखांना ती बॅट विकत घेतली. धोनीची पत्नी साक्षी फाऊंडेशनला निधीची आवश्यकता होती त्यासाठी या बॅटची विक्री करण्यात आली. साक्षी फाऊंडेशनच्या माध्यमातून लहान मुलांसाठी काम केले जाते.

वानखेडेवरील त्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून गौतम गंभीरने सर्वाधिक ९७ धावा केल्या. महेंद्रसिंह धोनीने नाबाद ९१ धावांची खेळी साकारल्यामुळे भारताला दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरता आले. धोनीने त्याच्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार ठोकले.