दिग्विजय अकादमीने ६९ पदकांसह राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत आघाडी कायम राखली. अनिरुद्ध मोहिरे याने चार प्रकारात सुवर्णपदक जिंकताना आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला.
शिवसृष्टी (कात्रज, आंबेगाव) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अनिरुद्ध याने लहान खेळाडूंच्या विभागात ड्रसाज, हॅक्स, जिलबी शर्यत, संगीत खुर्ची या प्रकारात प्रथम स्थान मिळविले. मध्यम गटात सोहम फडे याने बादलीत चेंडू टाकणे व ड्रसाज या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. युवा विभागात ज्ञानेश्वरी विचारे हिने बादलीत चेंडू टाकणे व ड्रसाजमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. देविंदरसिंग अरोरा यानेही युवा मुलांच्या विभागात याच क्रीडा प्रकारात सोनेरी कामगिरी केली.
डोळ्यावर पट्टी बांधून जमिनीवरील सर्व साहित्य घेऊन घोडय़ावर बसणे या प्रकारात सनी सोनार हा विजेता ठरला. आयुष साळुंखे याने तीन प्रकारात सुवर्णपदक जिंकून तिहेरी कामगिरी केली. या स्पर्धेत अकलूजच्या दी ग्रीन फिंगर्स संघाने ४९ पदकांसह दुसरे स्थान घेतले आहे. फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेने २५ पदकांसह तिसरे स्थान मिळविले आहे.
सविस्तर निकाल- ड्रसाज-लहान गट-१.अनिरुद्ध मोहिरे, २.अभिषेक शिंदे. मध्यम गट-१.सोहम फडे, २.श्रिया पुरंदरे. कुमार गट-१.जान्हवी कदम, २.अनिकेत साळुंखे. युवा गट-१.देविंदरसिंग अरोरा, २.हर्षवर्धन नखाते. मुली-१.ज्ञानेश्वरी विचारे, २.जान्हवी कदम.
ब्लाईन्ड सॅडल फिटिंग-लहान गट-१.सनी सोनार, २.अनिरुद्ध मोहिरे. मध्यम गट-१.हृषिकेश चौगुले, २.जान्हवी कदम. युवा गट-१.राजेश लबड, २.गणेश पाटील.
हॅक्स-लहान गट-१.अनिरुद्ध मोहिरे, २.अभिषेक शिंदे. मध्यम गट-१.आयुष साळुंखे, २.रोहित थोरात. कुमार गट-१.हर्षवर्धन नखाते, २.जान्हवी कदम. खुला गट-१.मुकुंद राणे, २.भूषण पाटील.

मातृशोक होऊनही स्पर्धा स्थळावर कार्यरत
स्पर्धेची जबाबदारी घेणाऱ्या संघटकांना अडचणीच्या प्रसंगांना सामोरे जातच स्पर्धा यशस्वी करावी लागते. ही स्पर्धा आयोजित करणारे गुणेश पुरंदरे यांच्या मातोश्रींचे बुधवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. त्या वेळी गुणेश हे स्पर्धेच्या ठिकाणी होते. आईवर अंत्यसंस्कार करून ते पुन्हा सायंकाळी स्पर्धेच्या ठिकाणी आले व संयोजनाचे काम करू लागले. त्या वेळी अनेक खेळाडू व प्रशिक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला.