हॉकी इंडियाचे उच्च कामगिरी संचालक डेव्हिड जॉन यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. जॉन यांचे नुकतेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) कराराचे नूतनीकरण करून देण्यात आले होते. मात्र तरीदेखील हॉकी इंडियामधील पदाधिकाऱ्यांसोबत अनेक वर्षे असलेल्या वादातून हा राजीनामा दिल्याचे डेव्हिड जॉन यांनी स्पष्ट केले आहे.

‘साइ’कडून जॉन यांना सप्टेंबर २०२१ पर्यंत कराराचे नूतनीकरण करुन देण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी हॉकी इंडिया आणि ‘साइ’ यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. हॉकी इंडियाने त्यांचा राजीनामा मंजूर केल्याचे कळते, मात्र ‘साइ’ने याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याचे समजते. हॉकी इंडिया संघाच्याबाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जॉन यांचे मत विचारात घेत नव्हते. त्यामुळेही जॉन यांची नाराजी होती.