विराट कोहलीची आक्रमकता व नेतृत्व शैली याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थीत केले जातात. यंदाच्या IPL स्पर्धेतही विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला काही विशेष कामगिरी बजावता आली नाही. परिणामी आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विराटच्या नेतृत्वाबाबत आता पुन्हा एकदा शंका उपस्थीत केली जात आहे. परंतु भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मात्र, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वशैलीची स्तुती केली आहे.  आयपीएलमधील प्रदर्शनाची तुलना टीम इंडियासाठी केलेल्या कामगिरीशी होऊ शकत नाही, आयपीएलमध्ये विराटने कशाप्रकारे नेतृत्व केलं याचा विश्वचषकात फरक पडणार नाही, कारण त्याची भारतीय एकदिवसीय कर्णधार म्हणून कामगिरी उत्तम आहे, असं गांगुलीने म्हटलं आहे.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, ‘विराट एक उत्तम कर्णधार आहे. त्याची तुलना IPL स्पर्धेतील कामगीरीच्या आधारे महेंद्रसिंह धोनी किंवा रोहित शर्मा यांच्या नेतृत्वशैलीशी करणे उचित ठरणार नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, त्याची प्रवृत्ती आणि व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. आपण विराटची त्याच्या अफलातुन कामगिरीच्या जोरावरच कर्णधारपदासाठी निवड केली आहे’,  असं गांगुलीने म्हटलं.

तसेच, ‘गेल्या तीन वर्षात तो सातत्याने उत्तमरीत्या कर्णधारपद भूषवत आहे. भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वातील दादा समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रीका आणि श्रीलंका या संघांना त्यांच्याच घरात हरवण्याचा पराक्रम केला आहे. या पार्श्वभूमीवर विचार करता विराटच कर्णधारपदासाठी योग्य आहे हे सिद्ध होते. IPL व विश्वचषक या दोन्ही स्पर्धांची तुलना करणे योग्य ठरणार नाही. उलट महेंद्रसिंह धोनी व रोहित शर्मा यांच्या अनुभवाचा विराट कोहलीला फायदाच होईल’ असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे.