एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा

ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान संघर्षपूर्ण लढतीत ७-५, ६-७ (१०/१२), ७-६ (७/५) असे मोडीत काढत एटीपी फायनल्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. थिमने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

थिमने गेल्या वर्षीही गटवार साखळी लढतीत जोकोव्हिचला पराभूत केले होते. थिमचा जोकोव्हिचविरुद्धचा हा पाचवा विजय ठरला. जोकोव्हिचने मात्र थिमविरुद्धचे सात सामने जिंकले आहेत. शनिवारी रंगलेल्या पहिल्या उपांत्य लढतीत गेल्या काही वर्षांत व्यावसायिक टेनिसमध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या थिमचा जोकोव्हिचसमोर किती निभाव लागेल, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पण थिमने पहिला सेट ७-५ असा जिंकत विजयाच्या दिशेने वाटचाल केली.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र जोकोव्हिचने जोमाने पुनरागमन केले. दोघांनीही तोडीस तोड खेळ केल्यामुळे दुसरा सेट टायब्रेकरमध्ये गेला. अखेर जोकोव्हिचने आपला पूर्ण अनुभव पणाला लावत हा सेट जिंकत लढतीत रंगत आणली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये जोकोव्हिचचे पारडे काहीसे जड मानले जात होते. पण थिमने त्याला कडवी लढत दिली. टायब्रेकरमध्ये थिम ०-४ असा पिछाडीवर पडला होता. पण त्यांनतर जबरदस्त कामगिरी करत थिमने विजयश्री खेचून आणली. या विजयासह थिमने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा काढला.