आगामी काळात होऊ घातलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात खेळवू नये, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला (आयसीसी) केली आहे. दहशतवाद्यांकडून भारतीय लष्कराच्या उरी येथील तळावर करण्यात आलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेली धडक कारवाई यामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर उमटण्याची शक्यता लक्षात घेता अनुराग ठाकूर यांनी अशाप्रकारची मागणी केल्याची शक्यता आहे. एरवीसुद्धा भारत आणि पाकिस्तानचे संघ समोरासमोर आल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांविरुद्ध त्वेषाने खेळताना दिसतात. २०१२ पासूनच दोन्ही राष्ट्रांमध्ये एकही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवण्यात आलेली नाही. मात्र, विश्वचषक स्पर्धेसारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतात.
मात्र, उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून भारताकडून पाकिस्तानला विविध पातळ्यांवर एकटे पाडण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर आता बहुराष्ट्रीय स्पर्धेतही दोन्ही संघ आमनेसामने येऊ नयेत, असे बीसीसीआयला वाटत आहे. बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेतही या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याचे तणावपूर्ण संबंध पाहता चॅम्पियन्स ट्रॉफीत दोन्ही संघांना एकाच गटात न खेळवणे श्रेयस्कर ठरेल. आम्ही हा विचार आयसीसीसमोरही मांडला. अन्यथा ट्वेन्टी-२० विश्वचषकातील धर्मशाळा येथील सामन्याप्रमाणे ऐनवेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिला. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही ठाकूर यांनी सांगितले.