भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोव्हिड कृती दलाची स्थापना केली असून त्यामध्ये माजी कर्णधार राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख आहे. द्रविडकडे कोव्हिड कृती दलाचा प्रमुख म्हणून जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

खेळाडूंनी ‘एनसीए’मध्ये सरावाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची करोना चाचणी घेण्यात येणार आहे तसेच त्यांना सरावादरम्यान कोणती काळजी घ्यायची आहे याची सूचना देण्याची जबाबदारी या कृती दलाकडे आहे. ‘एनसीए’चा प्रमुख म्हणून द्रविडसह वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता अधिकारी यांचा समावेश आहे.  सरावाच्या दिवशी दररोज सकाळी खेळाडूंचे शरीराचे तापमानही तपासण्यात येणार आहे. जर एखादा खेळाडूमध्ये सरावादरम्यान करोनाची लक्षणे आढळली, तर त्याचे तातडीने विलगीकरण करण्यात येणार आहे.

क्रिकेट साहित्याच्या पुरस्कर्त्यांसाठी निविदा

‘बीसीसीआय’ने भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्यासाठी पुरस्कर्त्यांकरता निविदा मागवल्या आहेत. ‘नायके’ हे सध्याचे ‘बीसीसीआय’चे क्रिकेट साहित्यासंदर्भातील पुरस्कर्ते आहेत. गेल्या चार वर्षांपासून ‘नायके’ पुरस्कर्ते असून त्यांचा ‘बीसीसीआय’शी असणारा करार पुढील महिन्यात संपत आहे.