हरयाणा मधील अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला जाण्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राची संघनिवड; अमिर धुमाळ वगळता ११ जणांची माघार

हरयाणा येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या दीनदयाळ उपाध्याय अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातील अमिर धुमाळ वगळता ११ खेळाडूंनी मनमर्जीने माघार घेतली आहे. त्यामुळे बुधवारी संघ हरयाणाकडे रवाना होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेला संघनिवडीसाठी खेळाडूंची जमवाजमव करावी लागली.

हरयाणामधील हिसार येथे २२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ११ खेळाडूंनी वैयक्तिक कारणे देत विश्रांती घेतली आहे. एअर इंडियाचा संघ स्वतंत्रपणे या स्पर्धेत सहभागी होणार होता. मात्र तो संघसुद्धा सहभागी होऊ शकला नाही. परंतु खेळाडूंच्या माघारसत्रामुळे महाराष्ट्राची संघनिवड प्रक्रिया मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. त्यामुळे संघटनेला राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या १२ जणांपैकी ११ बदल करावे लागले आहेत.

सिन्नरला झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सुलतान डांगे आणि सूरज देसाई यांनी दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन केले होते. मात्र तरीही रोहा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी त्यांना महाराष्ट्राच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. परंतु या माघारसत्रामुळे राज्य संघटनेने सुलतान आणि सूरज यांच्यासह मराठवाडय़ाच्या जिल्ह्य़ांमधील काही खेळाडूंनाही स्थान दिले आहे.

महाराष्ट्राचा संघ

कर्णधार अमिर धुमाळ (रायगड), सूरज देसाई (नंदूरबार), अरविंद देशमुख (पालघर), आशीष मोहिते (उपनगर), प्रदीप शिंदे (रत्नागिरी), गणेश ढेरांगे (पुणे), परेश म्हात्रे (ठाणे), विजेंद्र सपकाळे (जळगाव), प्रणव आहिरे (नाशिक), मरतड फुंडे (बीड), सुलतान डांगे (रायगड), कृष्णा गायके (जालना); प्रशिक्षक : रामचंद्र जाधव, व्यवस्थापक : तानाजी भिलारे.