भाराताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटालीमध्ये सुवर्णपदक पटकावत एतिहासिक कामगीरी केली आहे. इटलीमधील नेपल्स शहरात सुरु असलेल्या ३०व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दुती चंदने १०० मीटर शर्यतीत सुवर्णकामगिरी केली आहे. द्युतीने १०० मीटर अंतर ११.३२ सेकंदात पार करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. शिवाय या जागतिक स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती चंद पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याआधी एकाही भारतीय स्पर्धकाला युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर शर्यतीत पात्रता फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती. या स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या अँजला डेल पोंटेने ११.३३ सेकंदात १०० मीटर अंतर पार करत रौप्य पदक पटकावले आहे.

द्युती चंदच्या या ऐतिहासीक कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. द्युती चंदने ट्विट करत सुवर्णपदक पटकावल्या माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनीही तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.