आयपीएलचा पहिला आठवडा चाहत्यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या महत्वाच्या खेळाडूंशिवाय पहावा लागणार असं दिसतंय. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाचा संघ मर्यादीत षटकांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये येणार असल्याचं जाहीर केलंय. ३ वन-डे आणि ३ टी-२० अशी ही मालिका रंगणार आहे. ४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत ही मालिका रंगणार आहे.

२४ ऑगस्टरोजी ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये दाखल होईल. यानंतर ४ सप्टेंबर रोजी पहिला टी-२० सामना खेळण्याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसीच्या नव्या नियमाप्रमाणे स्वतःला क्वारंटाइन करुन घेईल. असं आहे ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक –

पहिला टी-२० सामना – ४ सप्टेंबर

दुसरा टी-२० सामना – ६ सप्टेंबर

तिसरा टी-२० सामना – ८ सप्टेंबर
———————————————————————–

पहिला वन-डे सामना – ११ सप्टेंबर

दुसरा वन-डे सामना – १३ सप्टेंबर

तिसरा वन-डे सामना – १६ सप्टेंबर

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होईल. करोनामुळे नवीन नियमांनुसार खेळाडूंना युएईत आल्यानंतर काही दिवस स्वतःला क्वारंटाइन करुन घ्यावं लागेल. त्यामुळे आयपीएलमध्ये महत्वाच्या संघांनाही सुरुवातीच्या आठवड्यांत प्रमुख परदेशी खेळाडूंव्यतिरीक्त मैदानात उतरण्याची तयारी करावी लागणार आहे.