क्रिकेटसारख्या ब्रिटिशांच्या खेळात भारताने अभूतपूर्व प्रगती केली. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताने अधिराज्य गाजवले. जणू क्रिकेट हाच खेळ भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य बनला आहे, पण भारताने देणगी दिलेल्या बुद्धिबळासारख्या खेळात आपणच इतके मागे का पडलो आहोत, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. युरोपीयन देशांच्या तुलनेत भारताची बुद्धिबळातली वाटचाल संथ गतीची असली तरी विश्वनाथन आनंदच्या जगज्जेतेपदामुळे गेल्या काही वर्षांत भारताची बुद्धिबळातील स्थिती सुधारत चालली आहे, हे आश्वासक चित्र समाधान देणारे आहे.
सहाव्या शतकात युद्धासाठी रणनीती आखण्यासाठी, आपल्या राज्यात भविष्यात काय घडणार आहे, याचे आडाखे बांधण्यासाठी तसेच प्रतिस्पध्र्यावर मात कशी करता येईल, यासाठी डावपेच आखण्यासाठी बुद्धिबळाचा वापर केला जायचा. त्या वेळी या खेळाला ‘चतुरंग’ असे संबोधले जायचे. मुघलांच्या काळात हा खेळ ‘शतरंज’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या खेळात बरेचसे बदल केल्यानंतर ब्रिटिशांच्या काळात बुद्धिबळाला राजाश्रय मिळाला. त्यानंतर या खेळाची लोकप्रियता वाढत गेली. पंजाबच्या मिर सुलतान खान यांनी १९२९, १९३२ आणि १९३३ मध्ये ब्रिटिश बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकतानाच आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. त्यांनी तीन वेळा चेस ऑलिम्पियाडमध्येही प्रतिनिधित्व केले. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली, पण भारताला पहिला ग्रँडमास्टर बनण्यासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली. विश्वनाथन आनंदच्या रूपाने १९८७ मध्ये भारताला पहिला ग्रँडमास्टर मिळाला. आजच्या घडीला भारताने ३०पेक्षा अधिक ग्रँडमास्टर आणि अनेक महिला ग्रँडमास्टर निर्माण केले आहेत. याचे श्रेय हे आनंदलाच जाते. भारतासाठी आनंद हाच बुद्धिबळ या खेळातला युगपुरुष ठरला.
बुद्धी, कौशल्य, संयम आणि एकाग्रतेच्या या खेळाकडे आपण फारसे गांभीर्याने कधी पाहिलेच नाही. एरव्ही वेळ घालवण्यासाठी, बुद्धीला चालना देण्यासाठी किंवा सुट्टय़ा पडल्या की बुद्धिबळ संच काढून तासन्तास एकाच जागेवर बुद्धिबळ खेळत बसायचे, हाच या खेळाप्रति सर्वाचा दृष्टिकोन असायचा, पण विश्वनाथन आनंदच्या विश्वविजेतेपदानंतर या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. गुणवत्ता असलेले अनेक खेळाडू या खेळाकडे करिअर म्हणून पाहू लागले. म्हणूनच आजच्या घडीला भारताकडे ग्रँडमास्टर्सची मोठी फौज निर्माण झाली आहे. भारतीय बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. म्हणूनच आज भारताने बुद्धिबळात जगात अव्वल दहा देशांमध्ये आणि आशियात अव्वल तीन देशांमध्ये स्थान मिळवले आहे.
आनंदप्रमाणेच पी. हरिकृष्ण, कृष्णन शशिकिरण, सूर्यशेखर गांगुली, अभिजित गुप्ता, कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि सौम्या स्वामिनाथन यांनी घेतलेली झेप कौतुकास्पद आहे.
बुद्धिबळ खेळल्यामुळे एकाग्रचित्ताने अभ्यास करताना बरेच फायदे होत असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिरात पाठवू लागले आहेत. प्रत्येक वर्षी या प्रशिक्षण शिबिरांना मिळणारा प्रतिसाद हा वाढू लागला आहे. त्यातूनच परिमार्जन नेगी, विदित गुजराथीसारखे युवा ग्रँडमास्टर्स तयार होऊ लागले आहेत. अनेक युवा ग्रँडमास्टर्स तयार होऊ लागल्यामुळे भारतही बुद्धिबळात महासत्ता होण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय स्पर्धामधील सहभागी होणाऱ्यांची वाढती संख्या, हे त्या दृष्टीने टाकलेले पुढचे पाऊल असेच म्हणावे लागेल. एकूणच बुद्धिबळातील भारताचे भवितव्य उज्ज्वल असल्याची स्थिती सध्या आहे.
विश्वनाथन आनंदनंतर भारताला एकही विश्वविजेता घडवता आला नाही, हे सत्य नाकारता येणार नाही. भारताकडे अफाट गुणवत्ता आहे, पण विश्वविजेतेपदापर्यंत मजल मारण्यासाठी त्यांना मिळणारे सहकार्य, उच्च दर्जाचे प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, पुरस्कर्त्यांचे भक्कम पाठबळ या सर्वाच्या अभावामुळे भारतात अद्याप एकच विश्वविजेता खेळाडू तयार होऊ शकला.
रशियासारख्या देशात बुद्धिबळ खेळाला सरकारकडून पूर्ण पाठिंबा मिळतो. बुद्धिबळ हा खेळ. त्यामुळे बुद्धिबळासाठी असलेल्या स्वतंत्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिग्गज बुद्धिबळपटूंचे मार्गदर्शन मिळते. मुलांमधील गुणवत्ता हेरून त्यांना सरकारकडून दत्तक घेतले जाते. त्यांच्या पुढील शिक्षणाचा आणि बुद्धिबळ खेळातील प्रशिक्षणाचा खर्च उचलला जातो. या सर्व गोष्टींचा अभाव भारतात दिसून येतो. रशिया किंवा पाश्चिमात्य देशांतील बुद्धिबळपटू तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असले तरी भारतात गुणवत्तेची खाण आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, अनेक स्पर्धामध्ये सहभागी होण्याची तसेच दिग्गज प्रतिस्पध्र्याशी दोन हात करण्याची संधी मिळाली, तर भारतही अनेक विश्वविजेते खेळाडू तयार करू शकेल, यात तिळमात्र शंका नाही.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2013 रोजी प्रकाशित
बुद्धिबळातले सम्राट!
क्रिकेटसारख्या ब्रिटिशांच्या खेळात भारताने अभूतपूर्व प्रगती केली. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताने अधिराज्य गाजवले. जणू क्रिकेट हाच खेळ भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य बनला आहे, पण भारताने देणगी दिलेल्या बुद्धिबळासारख्या खेळात आपणच इतके मागे का पडलो आहोत, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

First published on: 21-04-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emperor from chase