जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी दुसऱ्या डावात केलेल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर यजमान इंग्लंडने मँचेस्टर कसोटीत पाकिस्तानवर ३ गडी राखून मात केली आहे. दुसऱ्या डावात विजयासाठी २७७ धावांचं आव्हान मिळालेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. परंतु मधल्या फळीत बटलर-वोक्स जोडीने दमदार खेळ दाखवत चौथ्याच दिवशी संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडचा हा विजय भारतीय फिरकीपटू आर अश्विनच्या पथ्यावर पडला.

इंग्लंडने दुसऱ्या डावात ११७ धावांत ५ गडी गमावले होते. त्यानंतर बटलर-वोक्सने सामना जिंकवून देणारी भागीदारी केली. ती जोडी पाकिस्तानी फिरकीपटू यासिर शहाने तोडली. पहिल्या डावात ४ बळी घेणाऱ्या यासिर शहाने दुसऱ्या डावातही ४ बळी घेतले. पण इंग्लंडच्या दुसऱ्या डावात यासिर शहाला स्टुअर्ट ब्रॉडनंतर कोणताही बळी मिळाला नाही.

ख्रिस वोक्सने इंग्लंडचा विजय साकारत यासिर शहाला उर्वरित तीन बळींपैकी एकही बळी मिळवण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे ४०वी कसोटी खेळणाऱ्या यासिर शहाचे कसोटी कारकिर्दीत २२१ बळी झाले. भारताच्या अश्विनचे कसोटी कारकिर्दीत पहिल्या ४० कसोटींमध्ये २२३ बळी होते. अश्विनचा हा विक्रम यासिर शहाला मोडता आला नाही.

दरम्यान, पाकिस्तानचा पहिला डाव ३२६ धावांत तर इंग्लंडचा पहिला डाव २१९ धावांत आटोपला होता. पाकिस्तानचा दुसरा १६९ धावांत गुंडाळण्यात इंग्लंडला यश आले. त्यानंतर २७७ धावांचे आव्हान इंग्लंडने ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.