इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने आपल्या भेदक माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, दुसऱ्या दिवशी होल्डर आणि गॅब्रिअल जोडीने इंग्लंडला एकामागोमाग एक धक्के दिले. उपहारापर्यंत स्टोक्स आणि बटलरने इंग्लंडचा डाव सावरला होता. मात्र उपहारानंतर जेसन होल्डरने महत्वाच्या क्षणी इंग्लंडची जमलेली जोडी फोडत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.

६ फलंदाजांना माघारी धाडत जेसन होल्डर इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणारा वेस्ट इंडिजचा कर्णधार ठरला आहे. १९६६ साली गॅरी सॉबर्स यांनी लीड्सच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध ४१ धावांत ५ बळी घेतले होते. यानंतर तब्बल ५४ वर्षांनी होल्डरने हा विक्रम आपल्या नावावर जमा केला.

जेसन होल्डरला शेनॉन गॅब्रिअलने चांगली साथ दिली. इंग्लंडच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना झटपट माघारी धाडत गॅब्रिअलने यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. यानंतर होल्डरने महत्वाच्या क्षणी स्टोक्स आणि बटलरची भागीदारी तोडत साऊम्पटनच्या मैदानावर विक्रमी कामगिरीची नोंद केली.