विंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत बरोबरी साधण्यात अखेरीस यजमान इंग्लंडला यश आलं. सलामीचा सामना गमावल्यानंतर इंग्लंडने अखेरच्या दिवशी विजयश्री खेचून आणत वेस्ट इंडिजवर ११३ धावांनी मात केली. या विजयासह ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली आहे. अखेरच्या दिवशी विंडिजला विजयासाठी ३१२ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. परंतु इंग्लंडच्या माऱ्यासमोर विंडिजचा डाव कोसळला.

इंग्लंडला विजयासाठी एका बळीची आवश्यकता होती. शेवटच्या तासाचा खेळ सुरू होता. त्यामुळे फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर फलंदाज चूक करून बाद होईल अशी अपेक्षा कर्णधार जो रूटला होती. डॉम बेसने टाकलेला चेंडू केमार रोचने अतिशय सावधतेने टोलवला पण त्याचा अंदाज चुकला. ३१ चेंडूत ५ धावांची संयमी खेळी करणाऱ्या रोचने मारलेला फटका सिली पॉईंटवरील ओली पोपच्या दिशेने गेला. चेंडू हाताला लागून उडला. चेंडू हातून सुटतो असं वाटताच पोपने झेप घेतली आणि अप्रतिम असा झेल टिपत विजयाचा कळस रचला.

पाहा व्हिडीओ –

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात बेन स्टोक्सने फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. स्टोक्सच्या फटकेबाजीनंतर इंग्लंडने आपला दुसरा डाव १२९ धावांवर घोषित करुन विंडीजला ३१२ धावांचं आव्हान दिलं. मात्र विंडीजची दुसऱ्या डावातली सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या ३७ धावांत विंडीजचे चार शिलेदार माघारी परतले. ब्रुक्स, ब्लॅकवूड आणि कर्णधार जेसन होल्डर यांचा अपवाद वगळता एकही विंडीज फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. पहिल्या डावात चांगली कामगिरी करणारे क्रेग ब्रेथवेट, रॉस्टन चेस हे दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी परतले. ब्रुक्सने ६२ तर ब्लॅकवूडने ५५ धावांची खेळी केली. कर्णधार जेसन होल्डरनेही ३५ धावांची खेळी करत चांगली झुंज दिली. अखेरीस विंडीजचा दुसरा डाव १९८ धावांवर संपवत इंग्लंडने सामन्यात विजय मिळवला.