01 March 2021

News Flash

ENG vs WI : स्टुअर्ट ब्रॉडने ‘असा’ घेतला ५००वा बळी; पाहा Video

कसोटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा सातवा गोलंदाज

स्टुअर्ट ब्रॉडने या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करत आपला ठसा उमटवला. पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान न मिळालेल्या ब्रॉडने उर्वरित दोन सामन्यांत धडाकेबाज कामगिरी करत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.

इंग्लंडविरूद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजची दाणादाण उडाली. पहिल्या डावात १९७ धावांवर गारद होणाऱ्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावातदेखील पहिले तीन गडी झटपट गमावले. तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजची अवस्था २ बाद १० अशी झाली होती. त्यानंतर चौथ्या दिवशीचा खेळ पूर्णपणे वाया गेला. पण पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात स्टुअर्ट ब्रॉडने वेस्ट इंडिजला धक्का देत तिसरा बळी टिपला. याचसह कसोटी क्रिकेटमध्ये ब्रॉडने ५०० बळींचा टप्पा गाठला.

वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने ३१ धावांत ६ बळी घेतले. त्यानंतर दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजने दिवसअखेर गमावलेले २ गडी ब्रॉडनेच घेतले. तेव्हा ब्रॉडचे ४९९ बळी झाले होते. ५००वा बळी टिपण्यासाठी त्याला एका दिवसाची वाट पाहावी लागली. चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, आज, पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने संयमी सुरूवात केली. क्रेग ब्रेथवेट बचावात्मक खेळत असतानाच ब्रॉडने त्याचा बळी टिपला आणि कसोटी क्रिकेटमधील आपला ५००वा गडी घेतला.

कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळी टिपणारा ब्रॉड सातवा गोलंदाज ठरला. याआधी वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श (२००१), ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (२००४), श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन (२००४), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (२००५), भारताचा अनिल कुंबळे (२००६), इंग्लंडचा जेम्स अँडरसन (२०१७) यांनी हा पराक्रम केला आहे.

धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या डावात एक विक्रमही केला. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ५० गडी बाद करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. ११ कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स १० कसोटीत ४९ बळी घेत दुसरा तर फिरकीपटू नॅथन लायन ४७ बळी घेत तिसरा आहे. भारताच्या मोहम्मद शमीने ९ कसोटी सामन्यांत ३६ बळी घेत चौथे स्थान मिळवले आहे, तर न्यूझीलंडचा टीम सौदी आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हे दोघेही ६ कसोटी सामन्यात ३३ बळी घेत संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 4:53 pm

Web Title: eng vs wi 3d test stuart broad has become 7th bowler in the history of the game to take 500 test wickets vjb 91
Next Stories
1 शिखर कसोटी संघात पुनरागमन करणार का?? माजी भारतीय खेळाडू म्हणतो…
2 कॅन्सरनंतर क्रिकेट ‘कमबॅक’साठी सचिनने दाखवला मार्ग – युवराज सिंग
3 खेळाडूच्या भावाला करोनाची लागण, ‘या’ क्रिकेट संघाने केला कँप रद्द
Just Now!
X