वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंड संघाने आश्वासक सुरुवात केली आहे. ३ कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत असल्यामुळे अखेरचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. अखेरच्या कसोटीत विंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यातील शतकवीर सिबलेला शून्यावर माघारी धाडत विंडीजने धडाकेबाज सुरुवात केली. परंतू यानंतर सलामीवीर बर्न्स आणि मधल्या फळीत ओली पोप आणि जोस बटलरच्या शानदार खेळीमुळे इंग्लंडने पहिल्या दिवसाअखेरीस ४ गड्यांच्या मोबदल्यात २५८ धावांपर्यंत मजल मारली.

केमार रोचने सिबलेला पायचीत पकडत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर कर्णधार जो रुट आणि रोरी बर्न्स यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कर्णधार जो रुट धावबाद होऊन माघारी परतला. ५० धावांच्या आत इंग्लंडने आपले प्रमुख फलंदाज गमावले होते. यानंतर बर्न्सने स्टोक्सच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. यादरम्यान बर्न्सने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. केमार रोचने स्टोक्सचा त्रिफळा उडवत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने बर्न्सही रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बर्न्सने ५७ धावांची खेळी केली.

यानंतर मैदानावर आलेल्या ओली पोप आणि जोस बटलर यांनी विंडीजच्या गोलंदाजांची डाळ शिजू दिली नाही. दोन्ही फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांचा सामना करत फटकेबाजी केली. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी आतापर्यंत १३६ धावांची भागीदारी रचली. दिवसाअखेरीस पोप नाबाद ९१ तर बटलर नाबाद ५६ धावांवर खेळत होता. विंडीजकडून पहिल्या दिवशी केमार रोचने २ तर रोस्टन चेसने एक बळी घेतला.