इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे अखेरच्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १९७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेरीस मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडने केलेल्या ३६९ धावांना प्रत्युत्तर देताना जेसन होल्डर आणि शेन डावरिच यांनी काही काळ झुंज दिली, पण त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही.

दमदार अर्धशतक झळकावणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवली. अवघ्या ३१ धावांत त्याने ६ बळी टिपले. ब्रॉडने १८व्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची किमया केली. तर १२व्यांदा एका डावात सहा बळी टिपण्याचा पराक्रम केला.

पाहा ब्रॉडचे ६ बळी-

एका डावात ६ बळी टिपणाऱ्या ब्रॉडच्या गोलंदाजीची सरासरी ७.५९ तर स्ट्राइक रेट १७.१ आहे. १० किंवा त्यापेक्षा अधिक वेळा डावात ६ बळी टिपणाऱ्या १४ गोलंजादांमध्ये ब्रॉडची आकडेवारी सरस आहे.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या ३६९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. क्रेग ब्रेथवेट १ धाव काढून बाद झाला. कॅम्पबेल आणि होप यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कॅम्पबेल ३२ तर होप १७ धावांवर माघारी परतले. ब्रुक्स आणि चेसदेखील एकेरी धावसंख्येवर बाद झाले. ब्लॅकवूडने बाद झाल्यावर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबेपर्यंत कर्णधार जेसन होल्डर आणि डावरिच यांनी खेळपट्टीवर तग धरला.

तिसऱ्या दिवसाच्या खेळात वेस्ट इंडिजचा संघ केवळ ६१ धावांची भर घालू शकला. होल्डर ४६ तर डावरिच ३७ धावांवर माघारी परतला. कॉर्नवॉल आणि रोच झटपट बाद झाले आणि डाव १९७ धावांत संपुष्टात आला. स्टुअर्ट ब्रॉडने ६ बळी घेतले. अँडरसनने २, तर आर्चर-वोक्सने १-१ बळी टिपला.