पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर यजमान इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली सुरूवात केली. इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन करत कर्णधारपदाची सूत्र हातात घेतली. नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजीची निवड केली. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने ३ गड्यांच्या मोबदल्यात २०७ धावांपर्यंत मजल मारली.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने सामन्यात काही बदल केले. कर्णधार जो रुटच्या पुनरागमनासोबतच अनुभवी स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांना वेगवान गोलंदाजाना संघात स्थान दिलं. तर शिस्तभंगाच्या कारवाईमुळे जोफ्रा आर्चरने संघातलं स्थान गमावलं. सामन्याला सुरुवातीला इंग्लंडने सावध पवित्रा घेतला. पहिल्या कसोटीत दाणादाण उडवणाऱ्या होल्डर – गॅब्रिअल जोडीचा फलंदाजांनी संयमाने सामना केला. मात्र सामन्याच्या ४६व्या षटकात या मालिकेत पहिला षटकार लगावण्यात आला.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स मैदानात होता. चेंडूला गती आणि उसळी कमी मिळत असल्याने होल्डरने फिरकीपटूंना गोलंदाजी दिली. ४६व्या षटकाचा दुसरा चेंडू रॉस्टन चेसने टाकला. अतिशय संयमाने गोलंदाजीचा सामना करणाऱ्या स्टोक्स थेट पुढे येऊन चेंडूला जोरदार तडाखा लगावला आणि षटकार लगावला. पहिल्या कसोटी सामन्यात एकही षटकार लगावण्यात आला नव्हता. त्यामुळे स्टोक्सने लगावलेला षटकार हा सामन्यातील पहिला षटकार ठरला.

दरम्यान, रोस्टन चेसने रॉरी बर्न्स (१५) आणि झॅक क्रॉली (०) यांना लागोपाठ बाद करत दोन बळी घेतले. चेसची हॅटट्रीकची संधी कर्णधार जो रुटने हुकवली. कर्णधार जो रुट खेळपट्टीवर स्थिरावतोय असं वाटताच अल्झारी जोसेफने अप्रतिम स्विंग गोलंदाजी करत त्याला २३ धावांवर माघारी धाडलं. त्यामुळे इंग्लंड ३ बाद ८१ अशा स्थितीत होता. त्यानंतर सलामीवीर डॉम सिबली ( (नाबाद ८६) आणि बेन स्टोक्स (नाबाद ५९) यांनी विंडीजच्या डाव सावरला. शतकी भागीदारी करत त्यांनी इंग्लंडला दिवसअखेर द्विशतक गाठून दिले.