बेअरस्टोचे दमदार शतक; पाचव्या लढतीत न्यूझीलंडवर मात

जॉनी बेअरस्टोच्या दमदार शतकाच्या बळावर इंग्लंडने पाचवी लढत सात विकेट आणि १७.२ षटके राखून जिंकली आणि एकदिवसीय मालिकेवर ३-२ असे वर्चस्व मिळवले. इंग्लंडने सलग सहावी एकदिवसीय मालिका जिंकण्याची किमया साधली.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत सर्व बाद २२३ धावा केल्या. यात मिचेल सँटनर (६७) आणि हेन्री निकोलस (५५) यांच्या अर्धशतकांचा समावेश होता. त्यानंतर इंग्लंडच्या डावात बेअरस्टो आणि अ‍ॅलेक्स हेल्स (६१) यांनी पहिल्या विकेटसाठी २०.२ षटकांत १५५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. बेअरस्टोने ६० चेंडूंत ९ चौकार आणि ६ षटकारांसह १०४ धावांची धडाकेबाज खेळी साकारून इंग्लंडचा विजय सुकर केला. बेअरस्टोला सामनावीर आणि ख्रिस वोक्सला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : ४९.५ षटकांत सर्व बाद २२३ (मिचेल सँटनर ६७, हेन्री निकोलस ५५; ख्रिस वोक्स ३/३२, आदिल रशीद ३/४२) पराभूत वि. इंग्लंड : ३२.४ षटकांत ३ बाद २२९ (जॉनी बेअरस्टो १०४, अ‍ॅलेक्स हेल्स ६१)