रवींद्र जडेजाला उद्देशून आक्षेपार्ह भाषा आणि धक्का दिल्याप्रकरणी भारतीय संघाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनविरोधात तक्रार दाखल केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडच्या संघाने रवींद्र जडेजाविरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे.
इंग्लंड संघाचे व्यवस्थापक फिल नेल यांनी यासंदर्भात तक्रार केली. अँडरसनला उद्देशून आक्रमक आणि धमकी स्वरुपाची भाषा आणि हावभाव यासाठी जडेजावर आयसीसी आचारसंहितेच्या कलम २ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास जडेजाला मानधनापैकी ५० ते १०० टक्के रक्कम तसेच एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यांची बंदीची शिक्षा होऊ शकते.
नॉटिंगहॅम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ उपाहाराला परतत असताना हा प्रकार घडला. भारतीय संघ व्यवस्थापनाने याप्रकरणाची माहिती इंग्लड क्रिकेट बोर्डाला दिल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर म्हणून जडेजाविरोधातच तक्रार दाखल केली. या प्रकरणात साक्षीदार म्हणून गौतम गंभीर आणि रवीचंद्रन अश्विन यांच्याकडून माहिती घेण्यात येणार आहे.