अ‍ॅशेस मालिका म्हणजे प्रतिष्ठेचा मानबिंदू. या मालिकेतील कसोटी विजय लौकिक उंचावणारा असतो, मात्र पराभव मनोधैर्याचे सपशेल खच्चीकरण करणारा असतो. पहिली कसोटी जिंकलेल्या इंग्लंड संघाला लॉर्ड्स कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र राखेतून भरारी घेण्याच्या जिद्दीने खेळ करत इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सनी विजय साजरा केला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली. दोन वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरामगन करणारा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
७ बाद १६८वरून ऑस्ट्रेलियाने पुढे खेळायला सुरुवात केली. यष्टीरक्षक फलंदाज पीटर नेव्हिलने कारकीर्दीतील पहिलेवहिले अर्धशतक पूर्ण केले. मात्र धावगती वाढवण्याच्या नादात फिनच्या गोलंदाजीवर त्याने आपली विकेट बहाल केली. खेळपट्टीवर ठाण मांडणाऱ्या नेव्हिलने १४७ चेंडूंत ५९ धावांची खेळी केली. नेव्हिल बाद झाल्यावर मिचेल स्टार्कने फटक्यांची पोतडी उघडली. मोइन अलीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत स्टार्कने अर्धशतक पूर्ण केले. बेन स्टोक्सने जोश हेझलवूडला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ११ धावा केल्या. त्यापाठोपाठ ५८ धावांवर स्टार्कला मोइन अलीने बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २६५ धावांत आटोपला आणि इंग्लंडला विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंडतर्फे फिनने ७९ धावांत ६ बळी घेतले.
या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक ७ धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला त्रिफळाचीत केले. धावांसाठी झगडणाऱ्या अ‍ॅडम लिथला (१२) हेझलवूडने पायचीत केले. इयान बेल आणि जो रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बेलने ६५ तर रूटने ३८ धावांची खेळी केली.
अँडरसनची चौथ्या कसोटीतून माघार
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे ट्रेंट ब्रिज येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीला त्याला मुकावे लागणार आहे. एजबस्टन येथे चालू असलेल्या तिसऱ्या कसोटीत गुरुवारी नवव्या षटकाचे तीन चेंडू टाकल्यानंतर इंग्लंडचा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज अँडरसनला मैदान सोडावे लागले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने अँडसरनच्या दुखापतीबाबत स्पष्टीकरण केले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १३६
इंग्लंड (पहिला डाव) : २८१
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ७९.१ षटकांत सर्वबाद २६५ (डेव्हिड वॉर्नर ७७, पीटर नेव्हिल ५९, मिचेल स्टार्क ५८, स्टीव्हन फिन ६/७९)
इंग्लंड (दुसरा डाव) : ३२.१ षटकांत २ बाद १२४ (इयान बेल ६५, जो रुट ३८)
सामनावीर : स्टीव्हन फिन