‘फॉर्मशी झुंजणारे टेनिसपटू सट्टेबाजांच्या निशाण्यावर असतात. एका संशयास्पद व्यक्तीने पैशाने भरलेल्या लिफाफ्यासह सामनानिश्चितीचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता’, असा खुलासा इंग्लंडचा माजी डेव्हिसपटू अरविंद परमारने केला. सोमवारी बीबीसी आणि बझफीड यांनी टेनिसविश्व ढवळून काढणाऱ्या फिक्सिंग प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने सामनानिश्चितीसाठी सट्टेबाजांनी
प्रस्ताव ठेवल्याचे स्पष्ट केले होते. ३७ वर्षीय परमारने २००६ मध्ये निवृत्ती स्वीकारली होती. गौप्यस्फोटाने फारसे आश्चर्य वाटले नसल्याचेही त्याने सांगितले.
‘ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत झटपट पराभूत होण्याची शक्यता जास्त असल्याने तिथे सामनानिश्चितीला अधिक वाव आहे. निम्नस्तरीय स्पर्धामध्ये सामनानिश्चितीची प्रकरणे होत असल्याच्या अफवा मी ऐकल्या आहेत. चॅलेंजर अर्थात टेनिस विश्वातील सगळ्यात प्राथमिक स्वरूपाच्या स्पर्धात खेळणारे खेळाडू सट्टेबाजांचे लक्ष्य असते. खर्चीक खेळाच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता असते. २००४ मध्ये नेदरलॅण्ड्समधील ग्रोनिनजेन स्पर्धेत पैसे घेऊन एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क केला. त्याने काहीही प्रश्न विचारले नाहीत. लिफाफ्यातील रक्कम पाहता ते आमिष खूप मोठे होते. दोन सेट्समध्ये सामना गमावण्याचा प्रस्ताव होता. मी तो तात्काळ नाकारला. तो माणूस दडपणाखाली होता. त्या स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर मी जेवढे पैसे कमावले असते त्यापेक्षा जास्त रक्कम हरण्यासाठी तो मला देत होता. पण त्याला होकार देण्याचा प्रश्नच नव्हता. क्षणभराचाही विचार न करता मी त्याला नाही म्हणालो’, असे परमारने सांगितले.