इंग्लंडच्या पुरुष संघाने वन डेतील सर्वोच्च धावसंख्या गाठली असतानाच इंग्लंडच्या महिला संघानेही टी- २० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली. विशेष म्हणजे महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडने अवघ्या काही तासांपूर्वीच केलेला विक्रम इंग्लंडने मोडला आहे. इंग्लंडच्या महिला संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २० षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात २५० धावा केल्या आहेत. तर यापूर्वी न्यूझीलंडने बुधवारीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना २० षटकांत २१६ धावा केल्या होत्या.

इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची तिरंगी टी- २० मालिका सुरु असून या मालिकेत बुधवारी पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तर दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडला. यातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने एका विकेटच्या मोबदल्यात २० षटकांत २१६ धावा होत्या. महिला टी- २० मधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. मात्र, हा विक्रम अवघ्या काही तासांमध्ये इंग्लंडने मोडला.

दुसऱ्या सामन्यात  इंग्लंडच्या सलामीवीर टॅमी बीमाँटने ५२ चेंडूत ११६ धावा तर डॅनियल वेटने ३६ चेंडूत ५६ धावा करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. टॅमीने १८ चौकार आणि ४ षटकार मारले. तर वॅटने नऊ चौकार मारले. मधल्या फळीत कॅथरिनने १६ चेंडूत नाबाद ४२ धावांची खेळी करत संघाला २५० चा पल्ला गाठून दिला.