आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने आपण सर्वांनी अनुभवले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात तब्बल २० सामने शेवटच्या षटकापर्यंत रंगले होते. मात्र केरळमधील एका स्थानिक सामन्यामध्ये संघ ४ धावांमध्ये माघारी परतला आहे.

केरळच्या मालापुरम जिल्ह्यात वायनाड आणि कासारगौड संघात सामना खेळवण्यात येत होता. पेरिनथमाला मैदानावरील सामन्यात कासारगौड संघ अवघ्या ४ धावांवर माघारी परतला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या संघातला अकरावा खेळाडूही एकही धाव काढू शकला नाही. कासारगौड संघातले दहाही फलंदाज त्रिफळाचीत होऊन माघारी परतले.

वायनाडच्या गोलंदाजांनी ४ धावा अतिरिक्त स्वरुपात दिल्यामुळे कासारगौड संघाने खातं उघडलं. विजयासाठी आवश्यक असलेलं ५ धावांचं आव्हान वायनाडच्या संघाने पहिल्याच षटकात पूर्ण केलं. या सामन्याची स्थानिक क्रिकेट वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.