गटवार साखळीत दोन लढती शिल्लक ठेवत आर्सेनल, लिस्टर आणि हॉफेनहेम यांनी युरोपा लीग फुटबॉलची बाद फेरी गाठण्यात यश मिळवले.

आर्सेनलने निकोलस पेपेच्या गोलमुळे नॉर्वेच्या मोल्डे संघावर ३-० अशी मात केली. याबरोबरच आर्सेनलने ‘ब’ गटात सलग चौथा विजय नोंदवत बाद फेरी गाठली. पेपे (५०वे मिनिट), रीस नेल्सन (५५वे मिनिट) आणि फोलारिन बालोगन (८३वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत आर्सेनलच्या विजयात योगदान दिले. पेपेचा या लीगमधील यंदाचा हा तिसरा गोल ठरला. तसेच त्याने दोन गोल होण्यातही दिलेले पास मोलाचे ठरले आहेत.

अन्य लढतीत लिस्टर सिटीला ब्रागाविरुद्ध ३-३ अशी बरोबरी पत्करावी लागली. मात्र या बरोबरीनंतरही ३२ जणांच्या बाद फेरीमध्ये लिस्टरला आगेकूच करता आली. जेमी वार्डीने अखेरच्या मिनिटामध्ये (९५वे मिनिट) केलेला गोल लिस्टरला बरोबरी साधून देणारा ठरला. लिस्टरने याआधीच्या तीनही लढती जिंकल्याने त्यांना ‘ग’ गटात अव्वल स्थान राखता आले.

जर्मनीचा संघ हॉफेनहेमने गटात सलग चौथा विजय मिळवताना लिबेरेकला २-० असे पराभूत केले. याबरोबरच सलग चौथ्या विजयासह हॉफेनहेमने बाद फेरी गाठण्यात यश मिळवले. ख्रिस्तोफ बॉमगार्टनर (७७वे मिनिट) आणि आंद्रे क्रॅमरिक (८९वे मिनिट) यांचा प्रत्येकी एक गोल हॉफेनहेमच्या विजयात मोलाचा ठरला.

टॉटनहॅमने चार सामन्यांतील तिसरा विजय नोंदवताना लुडोगोरेट्सवर ४-० अशी दमदार मात केली. कार्लोस विन्शियसचे (१६वे आणि ३४वे मिनिट) दोन गोल टॉटनहॅमच्या विजयात मोलाचे ठरले.

मॅराडोनाला श्रद्धांजली

युरोपा लीगच्या प्रत्येक लढतीपूर्वी महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाला खेळाडूंनी एक मिनिट उभे राहून श्रद्धांजली वाहिली. मॅराडोनाने त्याच्या कारकीर्दीत प्रतिनिधित्व केलेल्या नापोली संघानेही रिजेकावर २-० असा विजय मिळवला. नापोलीने याबरोबरच ‘फ’ गटातून चार सामन्यांतून तीन विजयांसह अग्रस्थान राखले.