गिरिप्रेमी संस्थेने आजपर्यंत माऊंट एव्हरेस्ट शिखर मोहिमेसह अनेक अवघड मोहिमा यशस्वी केल्या आहेत. त्यांची ही कामगिरी लक्षात घेता यंदा त्यांनी आयोजित केलेली एव्हरेस्ट-लोत्से या दोन्ही शिखरांची मोहीमही यशस्वी होईल, असा आत्मविश्वास ज्येष्ठ गिर्यारोहक ब्रिगेडियर अशोक अ‍ॅबे यांनी येथे व्यक्त केला.
गिरिप्रेमी संस्थेतर्फे यंदा एव्हरेस्ट व लोत्से या दोन्ही शिखरांवर उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेस ध्वज देण्याचा समारंभ अ‍ॅबे यांच्या हस्ते झाला. अ‍ॅबे यांनी यापूर्वी एव्हरेस्ट-लोत्से संयुक्त मोहीम यशस्वी केली होती.
गिर्यारोहकांना शुभेच्छा देत अ‍ॅबे म्हणाले, गतवर्षी गिरिप्रेमी संस्थेच्या काही सदस्यांचे एव्हरेस्टचे स्वप्न तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यांना यंदा पुन्हा हे स्वप्न साकार करण्याची संधी देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. लागोपाठ दोन वर्षे एव्हरेस्ट मोहीम आयोजित करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. तरीही हे आव्हान गिरिप्रेमीच्या सदस्यांनी पेलले आहे ही महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे.
मोहिमेचे नेते झिरपे यांनी सांगितले, यंदा या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी कापरेरेट क्षेत्राने स्वीकारली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गिर्यारोहण या साहसी खेळाचा अधिक जोमाने प्रसार होणार आहे.
या समारंभास कापरेरेट क्षेत्रातील मनीष साबडे, डी. एस. मुकादम, ए. पी. कुलकर्णी, मंदार नायकवडी, तसेच गिरिप्रेमी संस्थेचे संस्थापक आनंद पाळंदे हे उपस्थित होते.